– रात्रीच्या अंधारात उसाच्या ट्रॉलीचा अंदाज आला नाही अन् सगळंच संपलं!
श्रीगोंदा (अमर छत्तीसे) – काष्टी गावातील तीन तरुणांचा काल, दि.१३ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दौंड-पाटस रस्त्यावर वायरलेस फाट्यानजीक उसाच्या ट्रॅकटरला धडकून झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. रात्रीच्या वेळी उसाने भरलेल्या ट्रॉलीला दुचाकीने पाठीमागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, की यात या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. उसाच्या ट्रॉलीला रिफ्लेक्टर बसविण्यासाठी पोलिसांकडून अनेक वेळा जनजागृती केली जाते. मात्र, तरीही ट्रॅक्टर चालक आणि मालक याकडे सर्रास दुर्लक्ष करतात. याच कारणामुळे रात्रीच्या वेळी काष्टीतील या तरुणांचा नाहक बळी गेला आहे. ऋषिकेश महादेव मोरे (वय २६ ), स्वप्निल सतिष मनुचार्य (वय २४), गणेश बापू शिंदे (वय २५) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. हे तिन्ही तरुण काष्टी गावातील बाजारतळ परिसरात राहत होते. या घटनेमुळे संपूर्ण काष्टी गावावर शोककळा पसरली असून, आज काष्टी गाव बंद ठेवण्यात आले होते.
सविस्तर असे, की मयत झालेले तिन्ही तरुण काल रात्री दुचाकीवरून पाटसच्या दिशेने जात असताना, समोर चाललेल्या उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागील बाजूने धडकले, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे पुन्हा एकदा विना रिफ्लेकटर ऊस वाहतूक करणार्या वाहनावर कडक कारवाईचा मुद्दा समोर आला आहे. या घटनेनंतर काष्टी गाव बंद ठेवण्यात आले.
रिफ्लेक्टरचा मुद्दा ऐरणीवर!
उस वाहतूक करणार्या वाहनांना पाठीमागील बाजूस कोणत्याही प्रकारच्या रिप्लेक्टरचा वापर केला जात नाही. त्यामुळे रात्रीचे अपघात होतात. मागील वर्षीही अशाच अपघातात श्रीगोंदा शहरातील तीन तरुणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे साखर कारखान्याच्या संचालक मंडळांनी रिफ्लेक्टरचा मुद्दा गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
——————