– जादा पैसे उकळणार्या केंद्र चालकांचे तातडीने परवाने रद्द करण्याची गरज!
किनगावजट्टू, ता. लोणार (प्रतिनिधी) – विविध शासकीय दाखले, प्रमाणपत्रे, प्रतिज्ञापत्रे काढण्यासाठी राज्य सरकारने महा-ई-सेवा केंद्रे सुरु केली आहेत. त्याद्वारे सुशिक्षित बेरोजगारांना हक्काचा रोजगारही प्राप्त झालेला आहे. परंतु, हे केंद्र चालक मनमानी करत असून, खुलेआम लोकांची आर्थिक लूट करत आहेत. महसूल विभागाने जे दर ठरवून दिले आहेत, त्यापेक्षा तिप्पट ते चौपट पैसे उकळले जात असून, त्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. लोकांची आर्थिक लूट करून शासनाची फसवणूक करणार्या महा-ई-सेवा केंद्र चालकांचे परवाने तातडीने रद्द करण्याची मागणी ऐरणीवर आली आहे.
लोणार तहसील अंर्तगत नागरिकांच्या विविध प्रकारचे दाखले, जात प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र अशी कागदपत्रे देण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या समन्वयाने महा ई सेवा केंद्र स्थापित केले आहेत. सध्या पोलीस भरती, ग्रामपंचायत निवडणूक असल्यामुळे इच्छुक ग्रामस्थ, तरुणांना विविध प्रमाणपत्रे लागत आहेत. त्यामुळे सध्या महा ई सेवावाल्यांना सुगीचेच दिवस आले आहेत. नेमकी हीच बाब लक्षात घेता, लोणार तहसीलसमोरील महा ई सेवा केंद्रवाल्यांनी ठरवून दिलेल्या भावापेक्षा १०० ते २५० रूपये घेऊन चढ्यादराने प्रमाणपत्र काढणार्यांकडून सर्रास पैसे वसूल केले जात आहेत.
विशेष म्हणजे, जादा पैसे घेतल्यानंतर पावती वैगरे दिली जात नाही. या प्रकाराकडे लोणार तहसीलदार हे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. तरी तहसीलदारांनी महा-ई-सेवा चालकांना नियमानुसारच फी घेण्याची ताकीद द्यावी, अन्यथा त्यांचे परवाने रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना अहवाल द्यावा व परवाने रद्द करून गरजु व होतकरू सुशिक्षित तरुणांना ते द्यावेत, अशी मागणी पुढे आली आहे.
महा-ई-सेवा चालकांनी लोकांची लूट थांबवली नाही, तर याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ स्वतः महसूल मंत्र्यांकडे संबंधित केंद्र चालकांच्या नावानिशी लेखी फिर्याद दाखल करणार आहे. त्यासाठी गोपनीय व्हिडिओ रेकॉर्डिंगदेखील करणार आहे.