चिखली (एकनाथ माळेकर) – देऊळगावमही वीज उपकेंद्रातून कृषिपंपासाठी अनियमित व कमी दाबाने वीज पुरवठा केला जात असून, त्यामुळे मुबलक पाणी असतानाही शेतकर्यांना शेतीपिकांना पाणी देता येत नाही. आधीच खरिप हंगामात झालेल्या पावसाने शेतकर्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. आता हरबरा, गहू, ज्वारी, तूर, कपाशी या पिकांना पाणी देण्याची गरज असताना, वीजवितरणचे अधिकारी, कर्मचारी नियोजनशून्य कारभारामुळे शेतकर्यांच्या मुळावर उठले आहेत. गावठाण व कृषीपंप फिटर ओव्हरलोड होत असल्याचे कारण सांगून सर्रास वीजपुरवठा बंद केला जात असून, वीज भारनियमानाची मनमानी सुरु आहे. त्यामुळे शेतकर्यांना रात्री बेरात्री विजेची वाट पाहात जागून काढावी लागत आहे. शेतकरी, ग्रामस्थ यांचे हाल थांबवावे, अन्यथा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
डिग्रस भागाला देऊळगावमही ३३ केव्ही सब सेंटरवरून वीज पुरवठा तीन गावठाण तर तीन कृषीपंप फिटरद्वारे होतो. परंतु त्यात डीग्रस गावठाण व कृषीपंप फिटर ओव्हरलोड होत असल्याने व नियोजनाचा अभाव यामुळे गावठाणसह कृषीपंप वीज पुरवठा प्रभावित होत असून, एक आठवडा दिवसा तर एक आठवडा रात्रीचा वीज पुरवठा कृषीपंपांचा सुरू आहे. या आठवड्यात रात्रीचा वीज पुरवठा कृषीपंपांसाठी सुरू असून, सोमवारी छोट्या बिघडसाठी काही गावे पूर्णतः वीज पुरवठा कृषीचा बंदच राहिला, व शेतकरी रात्रभर वीज पुरवठा आता येईल मंग येईल या आशेवर रातभर शेतात पहारा देत राहिला. परंतु नियोजनशून्य कारभाराने वीज पुरवठा सुरळीत चालू झालाच नाही, व मंगळवारीसुद्धा रात्रीला कृषिचा वीज पुरवठा अनियमित व छोट्या छोट्या गोष्टी दुर्लक्षित केल्याने रात्री अकराची वेळ असतांना ऑपरेटरच्या सतर्कतेमुळे अर्धा भागातील वीज पुरवठा सोडण्यात आला, व अर्धा भाग ओव्हरलोडमुळे बंदच ठेवण्यात आला. एकंदरीत देऊळगाव मही सब स्टेशनवरून कृषीपंप व गावठाण एकाच वेळी सोडण्यात येत असल्याने व लोड जास्त प्रमाणात होत असल्याने गावठाणसुद्धा रात्रभर डीम-फुल करून प्रभावित झाले होते.
या सर्व प्रकाराला कंटाळून पाडळी शिंदे येथील शेतकरी तथा शिवसेना विभाग प्रमुख स्वप्नील शिंदे यांनी कार्यकारी अभियंता बुलडाणा यांना लेखी निवेदन दिनांक ९नोव्हेंबर रोजी सादर करून गावठाण डीम-फुल ठेवून जनजीवन प्रभावित करू नका. तसेच सततच्या पावसाने खरीप हंगाम शेतकरी वर्गाच्या हातून निघून गेला असून, मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतांना व फिटर ओव्हरलोड होत असल्याने शेतकरीवर्गाचे अतोनात नुकसान होत आहे. सद्या हरबरा, गहू, ज्वारी, तूर, कपाशी या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी वीज पुरवठा येण्याच्या वेळेवर शेतात रात्र जागून काढत असताना केवळ फिटर ओव्हरलोड म्हणून वेळ न दवडता कृषीपंपाला अर्धा अर्धा भाग करून नियमितपणे वीज पुरवठा द्यावा, व गावठाणसुद्धा डीम-फुल करून जनजीवन प्रभावित करू नका, तसेच काही गावांना वीज पुरवठाबाबत तुपाशी तर काहींना उपाशी ठेवण्यात येत आहे, या गंभीर प्रकाराकडेदेखील निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे. कृषीचा वीज पुरवठा रात्री सुरू असताना डीग्रस कृषीपंपचे दोन भाग करून वेळेचीसुद्धा फेरबदल न करता नियमित एकाचवेळी सोडण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कृषीपंप बिघडाकडे दुर्लक्ष न करता वेळीच दुरुस्ती करण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे व चर्चेअंती करण्यात आली असता, कार्यकारी अभियंता जायभाये यांनी कनिष्ठ अभियंता वीर यांना डीग्रस फिटरच्या समस्येकडे लक्ष देऊन बिघाड काढण्याच्या व सुरळीत वीज पुरवठा देऊन शेतकरीवर्ग यांना वीज पुरवठा देतांना दिरंगाई खपून घेणार नसून, वेळप्रसंगी कारवाईसाठीसुद्धा पाऊल उचलले जाईल, अशा सूचना भ्रमणध्वनीद्वारे दिल्या आहेत.
——————-