– जिल्हा दुष्काळ निवारण समितीचे पालकमंत्र्यांना मुंबईत पत्र
– लोणार येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेने तहसीलदारांना दिले निवेदन
बुलढाणा/ लोणार (विनोद पाटील तेजनकर) – परतीचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे या बुलढाणा जिल्ह्यासह व खास करून लोणार, मेहकर, चिखली तालुक्यातील सर्व शेतीपिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. ऐन सोंगणीस आलेल्या सोयाबीनचे ९० टक्के पीक नष्ट झाले असून, उर्वरित पीक खराब झालेले आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी बुलढाणा जिल्हा दुष्काळ निवारण समितीचे सदस्य सुधीर पडघान पाटील यांनी मुंबई येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदनाद्वारे केली आहे. तसेच, लोणार तालुक्यात काल दुपारनंतर ढगफुटी झाल्यामुळे शेतकर्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. तसेच नदी शेजारील पिके जमीन खरडून गेल्यामुळे वाहून गेली. तरी शासनाने तालुक्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी तहसीलदार यांना दिलेले निवेदनातून बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक बळीराम मापारी, लोणार तालुकाप्रमुख भगवान पाटील सुलताने यांच्यासह कार्यकर्त्यांनी केली आहे.
पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात सुधीर पडघान पाटील यांनी नमूद केले, की संपूर्ण आठवड्यात जवळपास सगळेच शेतकरी सोयाबीन सोंगणीला लागले असून, शेतात सोयाबीन सोंगलेली असताना अचानक दि.१७ ऑक्टोबरला दिवस रात्र पावसाने धुव्वाधार बॅटिंग केली. त्यामुळे शेतातील सोयाबीन वाहून गेली, उरलेल्या सोयाबीनच्या घुगर्या झाल्या, काहींनी सुड्या लावल्या होत्या, त्यामध्ये पाणी घुसले, तर काही सुड्यासुध्दा वाहून गेल्या. बळीराजाने खरीप हंगामात पेरणीसाठी पैसे उसनवारी घेतले, काहींनी तर आपल्या घरातील दागदागिने बँकेत ठेवले, ऐन दिवाळीच्या सण पोरगी माहेरी येणार, नातू जावई येणार, आता कशी दिवाळी करणार, असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. अशा संकटात बळीराजा सापडला आहे, हे माय बाप सरकार नक्कीच आमच्या मदतीला धावून येईल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून होत आहे. तरी पालकमंत्र्यांनी संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून, शेतकर्यांना भरघोस मदत द्यावी, अशी मागणी संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी यांच्यावतीने बुलढाणा जिल्हा दुष्काळ निवारण समितीचे सदस्य सुधीर पडघान यांनी केली आहे.
दुसरीकडे, लोणार तालुक्यात परतीच्या पावसाने हाहाकार उडविला असून, एका दिवसामध्ये ११७ मिलीमीटर पाऊस झाल्याने खरिपाचे हातातोंडाशी आलेली पिके शेतात पाणी साचल्याने पार सडून खराब झालेली आहेत. तालुक्यातील ५३३३४.८० हेक्टरवरील पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, हळद, तूर, मका, शेडनेटमधील पिके, भाजीपाला खराब झाला आहे. ऐन दिवाळीमध्ये शेतकर्यांचे पिकाचे नुकसान झाल्यामुळे कंबरडे मोडले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. भविष्याच्या विचाराने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे, तरी शासनाने लोणार तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपयाची मदत दिवाळीपूर्वी शेतकर्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक बळीराम मापारी यांच्यासह कार्यकर्त्यांनी आज तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी या पक्षाचे तालुकाप्रमुख भगवान पाटील सुलताने, खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष हिम्मत बापू सानप, जिल्हा परिषद सदस्य भगवान कोकाटे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख गजानन मापारी, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अशोक वारे, माजी सरपंच दीपक मोगरे, विजय डोईफोडे, रामेश्वर आघाव, पंचायत समिती सदस्य सुभाषराव सोनुने, समाधान राठोड, रमेश हाडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते यावेळी हजर होते.
————–