– दिवाळी सणावर आर्थिक संकटाचे सावट
लोणार (विनोद पाटील तेजनकर) – निसर्गाच्या लहरीपणामुळे अगोदरच हतबल झालेल्या शेतकर्याची परतीच्या पावसामुळे आणखीनच दयनीय अवस्था होऊन बसली आहे. यावर्षी सतत पडणार्या पावसामुळे अगोदरच सोयाबीन व इतर पिकांचे फार मोठे नुकसान झालेले आहे. काही प्रमाणात आलेल्या सोयाबीन सोंगणीच्या वेळेवर परतीचा पाऊस सुरू झाल्यामुळे आणखीनच नुकसान होऊन बसले. पाऊस जास्त असल्यामुळे सोयाबीनची खोडं ही हिरवी, आणि शेंगा पूर्णपणे वाळलेल्या असल्यामुळे त्याला कोंब फुटले आहेत. पावसाच्या भीतीने सोयाबीन सोंगल्याबरोबर सुड्या घातल्यामुळे या सुड्यासुद्धा आतून कुजल्या आहेत. त्यामुळे परतीच्या पावसाने शेतकरी मारला असून, आता राज्य सरकारने पोकळ घोषणा न करता त्यांना तातडीने मदत देण्याची गरज आहे.
पीकविमा कंपन्यांनी ऑनलाईनचा हेका लावल्याने, त्यांचे अॅपही डाऊन झालेले आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यास पीकविमा कंपन्या टाळाटाळ करत असून, जिल्हाधिकारी यांनी तातडीने या पीकविमा कंपन्यांना वठणीवर आणण्याची गरज आहे.
दररोज पडणार्या पावसामुळे सोयाबीनच्या सुड्यासुध्दा उघड्या केल्या जात नाहीत. यावर्षी बहुतेक शेतकर्यांनी फुले संगम या जातीची सोयाबीनची पेरणी केलेली आहे ,आणि ही जात थोडी उशिरा येत असल्यामुळे आणखीनच पावसाचा फटका सोयाबीनला बसत आहे. दिवाळीचा सण तोंडावर येऊन ठेपलेला आहे. बरेच शेतकर्यांचे आर्थिक व्यवहार सोयाबीन या पिकांच्या भरवशावर अवलंबून असतात. एकीकडे शेतामधील उभ्या सोयाबीनला कोंब तर दुसरीकडे झाकलेल्या सुड्या खराब होत आहेत .त्यामुळे शेतकर्यावर मोठे संकट कोसळले आहे. परतीचा पाऊस आणखी काही दिवस लांबल्यामुळे शेतकर्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. विमा कंपन्यांनी व शासनाने शेतकर्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत करून त्यांची किमान दिवाळी गोड करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
सिंदखेडराजा तालुक्यातही संततधार पावसाने सोयाबीन, कपाशीचे नुकसान
सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – संततधार पावसामुळे सोयाबीन तसेच कपाशी पिकांचे अतोनात नुकसान सिंदखेडराजा तालुक्यातदेखील झालेले आहे. विजांच्या कडकडाटासह संततधार पाऊस निमगाव वायाळ, तळेगाव, विजोरा, साठेगाव, सावंगी, दिग्रस आदी गावांसह परिसरात पडत असून, या पावसामुळे सोयाबीनच्या सुड्या खालून पाण्याने कुजत चालल्या आहेत. त्यामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निघून जात आहे. राज्य सरकारने या परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची दखल घेऊन स्थानिक पातळीवर तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच पीकविमा कंपन्यांना पीक नुकसानीच्या पाहणीचे आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकरी करत आहेत.