– सरकारी पर्जन्यमापक यंत्र बनले बेभरवशाचे!
चिखली (एकनाथ माळेकर) – परतीच्या पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. शेतात पाणी साचल्याने सोयाबीन शेतातच कुजले. मात्र, तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकार्यांनी तालुक्यात अतिवृष्टी झाली नसल्याचे सांगत शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. ज्या पर्जन्यमापक यंत्रावरून पर्जन्यमान मोजल्या जाते, ती यंत्रणाच कुचकामी असल्याचे शेतकरी सांगत आहेत. प्रत्यक्ष नुकसान होऊनही शेतकर्यांना सरकारी मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
यावर्षी पावसाळ्यातील काही दिवस वगळले तर सर्वदूर पाऊस पडला नाही. काही ठिकाणी जास्त तर काही भागात कमी पाऊस होता. मात्र, परतीच्या पावसाने कहरच मांडत शेतकर्यांना अक्षरश: रडवले आहे. काही ठिकाणची शेतजमीन खरडून गेली. चिखली तालुक्यात जवळपास ७२ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. पावसामुळे अनेक ठिकाणी अद्यापही सोयाबीनची सोंगणीच झाली नाही. त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. काही शेतकर्यांच्या शेतातील सोयाबीन अजूनही पाण्याखालीच आहे. पुराचे पाणी शेतातून गेल्याने जमीनही खरडून गेली आहे. तालुक्यातील तेरा मंडळामध्ये बसविलेले पर्जन्यमापक यंत्र वस्तुनिष्ठ पाऊस मोजत नसल्याने अतिवृष्टी होऊनही शासकीय दप्तरी तशी नोंद होत नाही. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाच्या कक्षेत शेतकरी बसणार नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अतिवृष्टी शेतात, पर्जन्यमापक शहरात
चिखली तालुक्यातील अमडापूर, चिखलीसह काही ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले आहे. हे यंत्रच सदोष असल्याची ओरड शेतकर्यांमधून होत आहे. अतिवृष्टी शेतात, पर्जन्यमापक मात्र शहरात असा मोठाच विरोधाभास आहे. कितीही पाऊस पडला तरी नोंद कमीच दाखविल्या जाते. याच पर्जन्यमापकाच्या आधारावर तहसीलदार अजित येळे आपले मत ठरवत आहेत. शेतात अतिवृष्टी होऊनदेखील शासनस्तरावरून आदेश असतानादेखील अद्यापही कुठल्याही नुकसानीची पाहणी तहसीलदारांनी केली नाही. त्यामुळे शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळणार की नाही? अशी भीती शेतकर्यांना आहे.
अतिवृष्टीच नाही, मग पाहणी का करणार? : तहसीलदार येळे

चिखली तालुक्यात अतिवृष्टी झालीच नसल्याने शेतकर्यांच्या शेतात पाहणीसाठी जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे अजब उत्तर तहसीलदार अजितकुमार येळे दिले. दुसरीकडे तालुक्यातील १८ हजार शेतकर्यांनी विमा दावा मिळण्यासाठी तक्रारी केल्या. तसेच तहसीलदारांकडे नुकसान झाल्याचे निवेदनदेखील दिले आहे. यावरून अधिकार्यांना शेतकर्यांबद्दल किती कळवळा आहे, हे दिसून येते.
शेतकरी संघटना आंदोलन छेडणार!
नुकसान होऊनदेखील पर्जन्यमापक यंत्रामध्ये पावसाची नोंद न झाल्याने शेतकर्यांना मदत मिळू शकणार नाही. याची माहिती समजताच शेतकरी संघटना तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार असल्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास कणखर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांनी सांगितले.