– मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई आयुक्तांना खडसावले, तुम्हाला विशेषाधिकार असताना अशी प्रकरणे आमच्याकडे येतातच कशी?
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाची उमेदवारी मिळालेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा तातडीने स्वीकारावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने देत सत्ताधारी शिंदे-फडणवीस यांना जोरदार झटका दिला आहे. महापालिकेच्या आडून कुटील असे राजकीय डावपेच आखले जात होते. परंतु, उद्या (दि.१४) सकाळी ११ वाजेपर्यंत याबाबतचे पत्र लटके यांना देण्यात यावे, असे न्यायालयाने महापालिका आयुक्तांना बजावले असून, महापालिकेला सुनावणीदरम्यान चांगलेच खडसावले आहे. तुमच्याकडे विशेषाधिकार असताना अशी प्रकरणे आमच्याकडे येता कामा नयेत, अशा शब्दांत आयुक्तांना त्यांच्या अधिकाराची जाण न्यायालयाने करून दिली. श्रीमती लटके यांच्या राजीनाम्यामुळे अकोला पॅटर्न चर्चेत आला होता. मुंबईत अकोला पॅटर्नची पुनरावृत्ती होते की काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे ‘अकोला पॅटर्न’ची पुनरावृत्ती टळली. यामुळे ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला दिलासा मिळाला आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे तिथे पोटनिवडूक होत आहे. ठाकरे गटाकडून लटकेंच्या पत्नी ऋतुजा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी मुंबई महापालिकेतील नोकरीचा राजीनामा दिला. मात्र तो स्वीकारला गेला नाही. त्यामुळे ठाकरे गटाने महापालिकेवर राज्य सरकारचा दबाव असल्याचा आरोप केला. तर असा कोणताच दबाव नसल्याचे पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितले. अशीच काहीशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिली. परंतु, हे सगळे राजकीय षडयंत्र कोण रचते आहे, याची जाणिव अंधेरीकरांसह महाराष्ट्राला झाली होती. ठाकरे गट उच्च न्यायालयात गेल्यानंतर, न्यायालयाने महापालिकेला राजीनामा स्वीकारणार की नाही, याबद्दल आजच २.३० वाजता भूमिका मांडण्यास सांगितले होते. महापालिकेने भूमिका मांडल्यानंतर न्यायालयाने श्रीमती लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय, आयुक्तांना चांगलेच फटकारूनदेखील काढले आहे.
दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व मतदारसंघाची जागा रिकामी झाली होती. या जागेसाठी निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून उमेदवार याआधीच जाहीर करण्यात आले होते. पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अडचणीत सापडली होती. कारण, रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या महापालिकेत कार्यरत होत्या. त्यांनी आपल्या महापालिकेच्या नोकरीचा राजीनामा दिला होता. पण तो राजीनामा जोपर्यंत मंजूर करण्यात येत नाही, तोपर्यंत त्यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरता येणार नव्हता. विशेष म्हणजे, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक होते. पण महापालिका प्रशासनाकडून त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नव्हता. त्यामुळे मोठे राजकीय घमासान बघायला मिळाले. अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडल्या. अखेर मुंबई महापालिकेच्या वरिष्ठांनी ऋतुजा लटरे यांचा राजीनामा स्वीकार करावा, यासाठी ठाकरे गट मुंबई उच्च न्यायालयात गेला होता. न्यायपीठाने याप्रकरणी लटके यांना दिलासा दिला आहे.
अकोल्यात काय घडले होते?
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेससमोर अकोल्यात पेच निर्माण झाला होता. अकोला लोकसभा मतदारसंघात डॉ. अभय पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती. भाजपचे विद्यमान खासदार आणि राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या विरोधात काँग्रेसने पाटील यांना उतरवले होते. संजय धोत्रे यांच्याविरोधात अभय पाटील असते तर भाजपचा पराभव निश्चित होता. त्यामुळे काँग्रेसने पाटील यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याची तयारी केली. मात्र पाटील शासकीय सेवेत होते. त्यांनी राजीनामाही दिला. मात्र तेव्हाच्या भाजप-शिवसेना आघाडी सरकारने अखेरपर्यंत पाटील यांचा राजीनामा मंजूर केला नाही. त्यामुळे अखेर काँग्रेसला उमेदवार बदलावा लागला. काँग्रेसकडून पाटील यांच्याऐवजी हिदायत पटेल यांना उमेदवारी देण्यात आली. पटेल तब्बल तीन लाख मतांनी पराभूत झाले. त्यावेळी आताचीच जोडगोळी सत्तेत होती. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते, तर एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री होते. त्यामुळे अंधेरीतदेखील अशीच पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा डाव होता, अशी चर्चा रंगली आहे.
————–
नीच पातळीचे राजकारण, कालच्या काल लाच मागितल्याची तक्रार दाखल
शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या राजीनामा प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. ऋतुजा लटके यांच्याविरोधात चौकशी प्रलंबित असून, त्यांच्याविरोधात लाच मागितल्याची तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेने हायकोर्टात दिली. विशेष म्हणजे, ही तक्रार काल, बुधवारी 12 ऑक्टोबर 2022 रोजी दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता चर्चा सुरू झाल्या आहेत. ऋतुजा लटके यांनी महापालिकेविरोधात याचिका दाखल केली होती. त्यावेळी लटके यांच्या वकिलांनी राजकीय दबावात राजीनामा स्वीकारला गेला नसल्याचे त्यांनी सांगितले.