– श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत; दसर्याच्या मुहूर्तावर चित्रपट होणार प्रदर्शित
लातूर (गणेश मुंडे) – उदगीर तालुक्यातील कुमठा गाव राजकीय चर्चेमुळे सदैव राहाते पण या पलीकडे आता फिल्मी दुनियेतही आता कुमठा गावातील तरूणामुळे चर्चेत येत आहे. के सायलेंटची प्रस्तुती असलेला आणि आनंद करीर दिग्दर्शित केलेल्या आपडी थापडी या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दसर्याच्या मुहूर्तावर ५ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटामध्ये कुमठा खुर्द ता. उदगीर येथील येथील अनुपकुमार केंद्रे याने चित्रपटातील मुख्य खलनायकाच्या स्टेफनीची भूमिका साकारली आहे. अनुपकुमार केंद्रे याचा एक वेगळा लूक आणि एक वेगळी भूमिका या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
अनुपकुमार केंद्रे हा मुळचा कुमठा खुर्द येथील. त्याच्या वडिलांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. अनुपचे दहावीपर्यंतचे शिक्षण हैदराबाद येथे झाले. तो २००५ मध्ये गावी परत आल्यानंतर त्याने पदवी प्राप्त केली. अभिनयाचे खूळ लहानपणापासूनच डोक्यात होते. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करायचे, या हट्टाने मुंबईमध्ये एमबीए करण्याचे त्याने ठरवले. मग काय मुंबई ही कलेची नगरी आहे. या ठिकाणी आपल्याला अभिनय क्षेत्रात करिअर करण्याच्या दृष्टीने वाट सापडेल, असे ठरवून ते मुंबईला गेले आणि एमबीए पूर्ण केल्यानंतर कार्पोरेट क्षेत्रात तीन वर्षे नोकरीही केली. पण कार्पोरेट क्षेत्रात त्याचे मन रमत नव्हते. थोडी आर्थिक बाजू जमा झाल्यानंतर कलेच्या क्षेत्रात त्याने नशीब अजमाविण्याचा ठरवले. सुरुवातीला थिएटर करयाचे त्यांना ठरवले आणि पृथ्वी थिएटर एनसीपीएच्या माध्यमातून या क्षेत्रात स्ट्रगल करण्यास सुरुवात केली. मालिका, जाहिरात अशा क्षेत्रात काम करीत असतानाच २०१९ मध्ये अनुप केंद्रेच्या जीवनांत आनंद येण्याअगोदरच यांच्या आईचे कर्करोगाने निधन झाले. त्यामुळे अभिनय क्षेत्रातील त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला दोन वर्षे ब्रेक लागला. आईच्या जाण्याने बसलेल्या धक्क्यातून सावरण फार अवघड होतं. पुन्हा मुंबईत येऊन स्ट्रगल करण्याची मानसिकता नव्हती, मात्र अनुप केंद्रे याने अभिनय क्षेत्रात नाव कमवावे, अशी त्यांच्या आईची इच्छा असल्याने पुन्हा २०२० मध्ये अनुप केंद्रे याचा या क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. पुन्हा त्यांनी थिएटर सुरू केले. लॉकडाऊनच्या काळात जाहिराती तयार करण्याच्या क्षेत्रात मोठे नाव असलेले दिग्दर्शक आनंद करीर यांच्याशी त्यांची भेट झाली.
आपडी थापडी या चित्रपटातील स्टेफनी या भूमिकेसाठी त्यांनी ऑडिशन दिलें. त्याची निवडही झाली. पुढे आनंद करीर यांनी त्यांना प्रोत्साहन दिले आणि पुन्हा एकदा आत्मविश्वासाने अनुप कुमार केंद्रे यांनी आपडी थापडीतील स्टेफनी या भूमिकेला चांगलाच न्याय दिला आहे. अनुपकुमार केंद्रे याने यापूर्वी हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. कुमकुम भाग्यम, ये है आशिकी, सावधान इंडिया याचबरोबर काही जाहिरातीही केल्या आहेत. नुकतीच त्याने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या सोबतही एक जाहिरात केली आहे. कुमठा खुर्द गावातील या तरुणाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत या क्षेत्रातील मिळवलेले यश कौतुकास्पद आहे.
दिग्गज कलाकार…
आपडी थापडी या चित्रपटातील खलनायक नवीन प्रभाकर यांचा साला म्हणजेच स्टेफनीच्या भूमिकेत कुमठा खुर्दचा हा सुपुत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटांमध्ये श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे, संदीप पाठक, खुशी हजारे, नवीन प्रभाकर यांच्यासोबत अनुप कुमार केंद्रे यांची एक वेगळी भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
फॅमिलीचा पिक्चर…
या भूमिकेसाठी मी दिग्दर्शक आनंद करीर यांना अपेक्षित असा न्याय देण्यास यशस्वी ठरलो आहे. नक्कीच प्रेक्षक माझ्या या भूमिकेचे स्वागत करतील, असे अनुप केंद्रे याने ब्रेकिंग महाराष्ट्रला सांगितले. प्रेक्षकांनी फॅमिलीचा हा पिक्चर फॅमिलीसोबत सिनेमागृहात जाऊन बघावा, असे आवाहनही त्याने केले आहे.
——————-