गुलाबराव पाटील बुलढाणा, विखे पाटलांकडे नगर-सोलापूर तर विजयकुमार गावीत नंदूरबारचे पालकमंत्री
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – सुरुवातीला मंत्रिमंडळाचा विस्तार आणि नंतर पालकमंत्र्यांच्या नेमणुका रखडल्याने टीकेचे धनी ठरलेल्या राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आजअखेर जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर केले आहेत. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूरसह पाच जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आहे. तर बुलढाण्याला गुलाबराव पाटील, औरंगाबादला संदीपान भुमरे, नगर व सोलापूरला राधाकृष्ण विखे पाटील, पुण्याला चंद्रकांतदादा पाटील, तर विजयकुमार गावीत नंदूरबार आणि दादा भुसे यांना अपेक्षेप्रमाणे नाशिकचे पालकमंत्रीपद मिळाले आहे. पालकमंत्री हेच जिल्ह्याचे नियोजनमंत्री असतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.
राज्य मंत्रिमंडळ अस्तित्वात येवूनही तब्बल दीड महिना पालकमंत्र्यांची यादी लटकली होती. काल दिल्लीमध्ये शिवसेनेचे बंडखोर नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर, आज अपेक्षेप्रमाणे यादी जाहीर झाली आहे. पालकमंत्री नसल्याने जिल्हा नियोजन समित्यांच्या बैठका झाल्या नव्हत्या. त्यामुळे संपूर्ण राज्याचाच विकास रखडला होता. त्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीकाही केली होती. देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री होतील, अशी अटकळ होती. परंतु, ते नागपूरसह वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत. तर चंद्रकांतदादा पाटील हे पुण्याचे पालकमंत्री झाले आहेत. या पालकमंत्र्यांकडे नियोजन मंत्री म्हणूनदेखील संबंधित जिल्ह्यांची जबाबदारी आहे.
– नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी –
राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, सोलापूर
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर, गोंदिया
चंद्रकांतदादा पाटील – पुणे
विजयकुमार गावित – नंदुरबार
गिरीश महाजन – धुळे, लातूर, नांदेड
गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव
दादा भुसे – नाशिक
संजय राठोड – यवतमाळ, वाशिम
सुरेश खाडे – सांगली
संदीपान भुमरे – औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
उदय सामंत – रत्नागिरी, रायगड
तानाजी सावंत – परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण – पालघर, सिंधुदुर्ग
अब्दुल सत्तार – हिंगोली
दीपक केसरकर – मुंबई शहर, कोल्हापूर
अतुल सावे – जालना, बीड
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे
मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
—————–