चिखली (तालुका प्रतिनिधी) – अंढेरा पोलिसांच्या ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्षामुळे या पोलिस ठाणेहद्दीत मोठ्या प्रमाणात गावठी दारूविक्री होत असल्याचे आज बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथे टाकलेल्या छाप्याने उघडकीस आली आहे. या छाप्यात अवैध देशीदारू (गावठी) विकणार्या चौघांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्यांना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. या कारवाईचे परिसरातून स्वागत होत असतानाच, शेजारील मिसाळवाडी गावातदेखील मोठ्या प्रमाणात गावठी दारूविक्री होत असून, तेथील दारूविक्रेत्यांवर ‘एलसीबी’ छापे कधी टाकणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया यांच्या मार्गदर्शनाखाली व एलसीबीचे पोलिस निरीक्षक गीते साहेब यांच्या आदेशाने एलसीबीच्या पथकाने अंढेरा पोलिस ठाणे हद्दीत आज (दि.२४) गावठी दारूविक्रेत्यांवर कारवाई केली. शेळगाव आटोळ, नारायणखेड येथे केलेल्या कारवाईत ३६०५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या पथकात अजिस परसुवाले, दिनेश बकाले, जगदेव टेकाळे या पोलिस कर्मचार्यांचा समावेश होता. त्यांनी एकूण चौघांवर कारवाई करत, त्यांना रंगेहाथ पकडले. त्यामध्ये शेळगाव आटोळ येथील शिवानंद छगन निकाळजे, भीमराव पांडुरंग बोराडे, शिवाजी रमेश वानखेडे व नारायणखेड येथील रामेश्वर भीमराव डोईफोडे या आरोपींचा समावेश आहे. हे चौघेही गावठी दारूचे सराईत धंदे करणारे आहेत.
अंढेरा पोलिस ठाणे हे सर्वात मोठे पोलिस ठाणे असून, या पोलिस ठाणेहद्दीतील बहुतांश गावांत गावठी दारूविक्री जोरात व खुलेआम सुरु आहे. शेळगाव आटोळ, मिसाळवाडी या गावात तर गावठी दारूचा महापूर आला आहे. ‘एलसीबी’च्या पथकाने शेळगाव आटोळात केलेल्या कारवाईचे स्वागत होत असले तरी, मिसाळवाडी येथेदेखील ‘एलसीबी’च्या पथकाने अचानक छापे मारून गावठी दारूविक्री करणार्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी होत आहे.
————–