शिवरायांच्या भूमीत ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे!
– शिवरायांच्या भूमीत असले नारे सहन केले जाणार नाहीत – मुख्यमंत्री शिंदे
– सरकारने यांना वेळीच ठेचावं, नाही तर हिंदू पेटून उठतील – राज ठाकरे
मुंबई/पुणे (विशेष राजकीय प्रतिनिधी) – राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)ने महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या कार्यालयांवर छापे टाकून या संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते ताब्यात घेतले होते. एनआयए, ईडी व एटीएसच्या या कारवाईविरोधात काल पीएफआयच्या काही कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले होते. या आंदोलनात पाकिस्तान झिंदाबादचे नारे लावण्यात आल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमुळे राज्यातील वातावरण तापले असून, छत्रपती शिवरायांच्या भूमीत पाकिस्तान झिंदाबादचे नारे लागल्याने मराठी जनमाणसही संतप्त झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपतींच्या भूमीत असले प्रकार खपवून घेणार नाही, अशा शब्दांत संबंधितांना इशारा दिला आहे. तसेच, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही या देशद्रोह्यांना वेळीच ठेचून काढावे, नाही तर हिंदू पेटून उठतील, असा इशारा ठाकरे यांनी दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या घटनेचा निषेध करत, सरकारने समाजकंटकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने देशातील अनेक राज्यांमध्ये पीएफआयविरोधात कारवाई केली आहे. यावरून अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. पुण्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. या घोषणाबाजीप्रकरणी पोलिसांनी रियाज सय्यद आणि ६० ते ७० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजकंटकांना रोखठोक इशारा दिला आहे. पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले, त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत, असे शिंदे यांनी म्हटले आहे.
#WATCH | Maharashtra: ‘Pakistan Zindabad’ slogans were heard outside the District Collector's office yesterday in Pune City where PFI cadres gathered against the recent ED-CBI-Police raids against their outfit. Some cadres were detained by Police; they were arrested this morning. pic.twitter.com/XWEx2utZZm
— ANI (@ANI) September 24, 2022
तर, पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा महाराष्ट्रात आणि भारतामध्ये देणार असेल तर त्याला सोडणार नाही. त्यांच्यावर कुठे असतील तिथून शोधून काढून कारवाई करू, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. त्यासोबच पीएफआयविरुद्ध पुरावे केंद्र आणि राज्य सरकारकडे उपलब्ध आहेत. याबाबतचा तपास चालू असून यामधून अनेक गोष्टी बाहेर येतील. देशात अस्वस्थता पसरवण्याचे षडयंत्र होते, असा आरोपही फडणवीसांनी केला आहे. तसेच, एनआयएने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकार्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्या. सरकारने ह्यांना वेळीच ठेचले पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले. ही अटक कशासाठी झाली? तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरं आयोजित करणे, ह्या गंभीर आरोपांखाली, थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी. तरीही ह्या देशद्रोह्यांचे समर्थन करत जर ह्या पीएफआयच्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल, तर तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेरं आमच्या देशांत चालणार नाहीत, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की फक्त ह्या देशद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या ह्या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की यापुढे पाण्यासाठीदेखील (पा) उच्चारता येणार नाही! नाहीतर आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. हिंदुस्थानातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहट्ट्यांच्या मुठी जर आवळल्या तर ह्या हरामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचे हित आहे, असेही राज ठाकरे म्हणालेत. या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल, असे राज ठाकरे यांनी पत्रकात म्हंटले आहे.
————–