BULDHANA

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेस ४ वर्षे पूर्ण; बुलढाणा जिल्ह्यात ‘आयुष्यमान भारत’ पंधरवड्यास सुरुवात!

– शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना आयुष्यमान कार्ड व फोटो ओळखपत्रे देणार

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेला आज चार वर्षे पूर्ण होत आहेत. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात गेल्या चार वर्षात २७ अंगीकृत रुग्णालये कार्यरत आहेत व मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत लाभ घेणार्‍यांची संख्या वाढावी, यासाठी आयुष्यमान भारत पंधरवडा साजरा केला जात आहे, अशी माहिती या योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. विवेक सावके यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना दिली.

आयुष्यमान भारत पंधरवडा १५ ते ३० सप्टेंबर या कालावधीत साजरा केला जात असून, आयुष्यमान भारत दिवस २३ सप्टेंबर होता. या योजनेला चार वर्षे पूर्ण झाल्याने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत विविध आरोग्यविषयक उपक्रम राज्यभर राबविले जात आहेत. जिल्ह्यात आरोग्य मेळावे तालुका तसेच जिल्हास्तरावर साजरे केले जाणार आहेत. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत लाभ घेण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील कुटुंबांना आयुष्यमान कार्ड व फोटो ओळखपत्र दिले जाते. रुग्णांसाठी जनआरोग्य योजना ही वरदान ठरत आहे. यासाठी आरोग्य प्रशासन प्रयत्न करीत आहे. आज जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत आयुष्मान भारत दिवस साजरा करण्यात आला. तसेच, योजनेत कार्यरत असलेले आरोग्यामित्र यांना प्रश्स्ती पत्र देवून सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत पाटील, जिल्हा समन्वयक डॉ. विवेक सावके , जिल्हा प्रमुख चेतन जाधाव, जिल्हा पर्यवेक्षक सुरज पवार व अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र उपस्थित होते. त्यादरम्यान जिल्हाधिकारी यांनी समन्वयक ह्यांच्याकडून योजने संदर्भात आढावा घेतला, तसेच योजनेच्या इतर कर्मचारी सोबत सखोल चर्चा केली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आयुष्मान भारत लाभार्थी रमेश विठ्ठल राठोड यांचे आयुष्मान भारत कार्ड त्यांचा मुलगा नितेश रमेश राठोड यांनी स्वीकारले.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत वेगवेगळ्या ९९६ आजारांकरीता ज्या रुग्णांकडे रेशन कार्ड आहे, अशा सर्वांना ९२ रुग्णालयातून योजनेचा लाभ घेता येतो. एकूण ७८ हजार रुग्णांनी लाभ घेतला. यामध्ये उपचार तसेच शस्त्रक्रिया आणि आरोग्यविषयक विविध बाबीचा समावेश आहे. या योजनेमुळे गरजवंताना दुर्धर आजाराचे ऑपरेशन करणे अथवा इतर उपचार करणे सहज सोपे होणार आहे. त्यासाठी ई-कार्ड महत्त्वाचे आहे, लाभार्थांनी सीएससी सेंटरवरून ई कार्ड काढून घ्यावे.
– डॉ.विवेक सावके, जिल्हा समन्वयक


जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा २४ सप्टेंबररोजी जिल्हा शल्यचिकित्सक नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत पाटील, बाह्य वैद्यकीय अधिकारी डॉ. यास्मिन परवीन, जिल्हा समन्वयक डॉ.विवेक सावके, जिल्हाप्रमुख चेतन जाधव, जिल्हा पर्यवेक्षक सुरज पवार, आरोग्यमित्र पियुष सावळे, योगेश्वर झगरे, मधुसूदन पवार, पवन बनसोडे, प्रणाली सपकाळ आदींच्या उपस्थितीमध्ये दोन आरोग्यमित्रांचा सत्कार जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये आरोग्यमित्र दीपाली अवसरमोल आणि आरोग्यमित्र किशोर ढवळे यांचा समावेश होता. जिल्हा समन्वयक डॉ.विवेक सावके यांनी जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यामध्ये होत असलेल्या आरोग्य शिबिरांबाबत आढावा आणि शाळेमध्ये होत असलेल्या जनजागृतीबद्दल माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!