खा. सुप्रिया सुळेंचा बनावट फोटो ट्वीट करून शिंदे गटाच्या प्रवक्त्या तोंडघशी!
– शीतल म्हात्रे यांनी ट्वीट केला मॉर्फ केलेला बनावट फोटो!
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीवर बसलेल्या असल्याचा बनावट फोटो ट्वीट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मदतीला धावून जाणे शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या चांगलेच अंगलट आले. म्हात्रे यांनी ट्वीट केलेला बनावट फोटो तातडीने हटवावा व माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे, असा दणदणीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी दिला आहे. खोटा फोटो करून शीतल म्हात्रे तोंडघशी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या फोटोला मार्फ सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा आदिती नलावडे यांनी सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने गंभीर आरोप केला होता. खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर बसून काम पाहत असल्याचा फोटो शेअर करत, राष्ट्रवादीने खळबळ उडवून दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी रविकांत वरपे यांनी हा फोटो ट्वीट केला होता. याबाबत बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी हा फोटो त्यांच्या निवासस्थानवरील असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता शिंदे गटाच्या प्रवत्तäया शीतल म्हात्रे यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. या फोटोमध्ये खासदार सुप्रिया सुळे या मुख्यंत्र्यांच्या खूर्चीवर बसलेल्या दिसत आहे. त्यांच्यासोबत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे बसल्याचे दिसत आहे. हा फोटो ट्वीट करताना, हा फोटो बघा कोण कुणाच्या खुर्चीत बसलंय? असा प्रश्न शीतल म्हात्रे यांनी विचारला आहे. परंतु, हा फोटो ट्वीट करून काही वेळ होत नाही तोच शीतल म्हात्रे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने तोंडघशी पाडले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी शीतल म्हात्रे यांनी ट्वीट केलेला फोटो पाहिल्याबरोबर आक्रमक प्रतिक्रिया नोंदवली. शीतल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे यांचा मॉर्फ फोटो पोस्ट केला आहे. त्यांची प्रतिमा मलीन करण्याच्या स्पष्ट हेतू या फोटोतून दिसत आहे. मुंबई पोलिसांनी त्वरित कारवाई करावी. तसेच शीतल म्हात्रे यांनी सुप्रियाताईंची माफी मागून पोस्ट डिलीट करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस कायदेशीर कारवाई करेल, असा इशाराच पक्षाच्यावतीने क्लाईड क्रास्टो यांनी दिला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. २३ एप्रिल २०२१ रोजी कोरोना उपाययोजनांबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. राज्यातील महाविकास आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे वर्षा या शासकीय निवासस्थानातून तर तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच दिलीप वळसे-पाटील मुख्यमंत्र्यांसोबत सदर बैठकीस मंत्रालयातून सहभागी झाले होते. त्यावेळेचा हा फोटो आहे, अशी माहिती देऊन राष्ट्रवादीच्या नेत्या आदिती नलावडे यांनी शीतल म्हात्रे यांचा दावा खोडून काढला. दरम्यान, या संपूर्ण वादग्रस्त फोटोप्रकरणी आता राष्ट्रवादी युवती काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीच्या वतीने जिल्ह्या-जिल्ह्यात आता शीतल म्हात्रेंच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सक्षणा सलगर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
——————-