भोकर, जि. नांदेड (हनुमान डाके) – तालुक्यातील मौजे सोमठाणा येथील आरोग्य उपकेंद्रावर शासकीय सेवेत असलेले डॉ. नारायण डाखोरे यांनी वैद्यकीय क्षेत्रात शासकीय सेवा करीत असतानादेखील उत्तम शेती जोपासली आहे. डॉ. डाखोरे हे सोयाबीन, केळी, हळद पिकांसह भाजीपाला लागवड करत सेंद्रीय शेतीला प्राधान्य देऊन नवनवीन तंत्रज्ञानाच्या आधारे भरघोस उत्पन्न घेत आहेत. उत्तम नोकरी, कविष्ठ शेती, असे आता म्हटले जाते. परंतु, डॉ. डाखोरे यांनी शेती आणि नोकरीही दोन्हीही उत्तमरित्या करता येते, हे दाखवून दिले आहे.
भोकर तालुक्यातील आमदरी येथे त्यांची वडिलोपार्जित शेतजमीन असून, विद्यार्थीदशेपासून त्यांना शेतीची मोठी आवड असल्याचे सांगितले. यंदाच्या खरीप हंगामात त्यांनी फुले संगम नावाची सोयाबीन पिकाची पेरणी केली. सद्यपरिस्थितीत सोयाबीनच्या एका रोपट्याला जवळपास २०० ते ३०० शेंगा परिपक्व झाल्याचे दिसून येते. यंदा भरपूर पावसाळा झाला असूनसुद्धा त्यांनी शेतीचे तंतोतंत नियोजन केल्याचे दिसून येते. हळद, भाजीपाला सेंद्रिय पद्धतीने पिकवतात. धावपळीच्या युगात मानवी आरोग्यासाठी रासायनिक खतांचा उपयोग करून पिकवलेला भाजीपाला आरोग्यासाठी हानिकारक असल्याचेसुद्धा ते सांगताहेत. आरोग्य सेवा देत असताना पिकांचीसुद्धा रासायनिक पद्धतीने शेती न करता सेंद्रिय पद्धतीने करण्याकडे त्यांचा कल दिसन येत आहे. धावपळीच्या युगात मजूर टंचाई भासत असताना ते स्वतः शेतीमध्ये राबतात व हळद, मिरची, टोमॅटो, भेंडी अशा वेगवेगळ्या पालेभाज्यांची करून बाजारापर्यंत लागवड पोहोचण्याची ते काळजी घेतात. हे सर्व करून वेळेच्या वेळी शासकीय सेवा बजावून शेतीमध्ये वेळ देतात. त्यामुळे उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी या जुन्या म्हणीला त्यांनी खरे करून दाखवल्याचे दिसून येते. परिसरातील शेतीनिष्ठ शेतकरी व जातिवंत शेतकरी यांना लाजवेल, अशी डॉ.नारायण डाखोरे यांची शेतीतील कामगिरी आहे.