-लोणार नगर संघ शाखेत विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव; पथसंचलनाला नागरिकांचा प्रतिसाद
लोणार (वाजिद खान) : लोणार नगर संघ शाखेच्या वतीने विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव शनिवारी, २४ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून भारतीय विचार मंचाचे बुलढाणा विभाग संयोजक नंदकिशोरजी जाणे उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून दि ग्रँड विश्वनाथ मंगल कार्यालय, लोणारचे संचालक विलासजी इरतकर, बुलढाणा जिल्हा संघचालक सुभाषजी मोरे, खंड संघचालक मंगेश शेटे आणि नगर संघचालक शिवशंकर खारवाल उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी गणवेशधारी स्वयंसेवकांचे पथसंचलन शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आले. या पथसंचलनाचे ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. महिलांनी रांगोळ्या काढून स्वयंसेवकांचे स्वागत केले. प्रास्ताविकात नगर संघचालक शिवशंकरजी खारवाल यांनी संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख अतिथी विलासजी इरतकर यांनी संघकार्याची आवश्यकता विशद करत प्रत्येक घरातील किमान एका व्यक्तीने संघकार्यात सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
प्रमुख वक्ते नंदकिशोरजी जाणे यांनी आपल्या उद्बोधनात इतिहासातील विविध उदाहरणे देत भारतीय समाजाने इतिहासाचे विस्मरण केल्यामुळे काय गमावले, यावर प्रकाश टाकला. “जो समाज आपला इतिहास विसरतो, तो आपले भविष्य गमावतो,” असे सांगत इतिहासाचे स्मरण आणि त्यातून प्रेरणा घेण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. असे विस्मरण पुन्हा होऊ नये, या उद्देशाने पूजनीय डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली, असेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला लोणार परिसरातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.