-संदल, छबीना, कुस्त्यांचा जंगी हगामा, कव्वालीचा मुकाबला आणि तमाशांची मेजवानी
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : तालुक्यातील बोधेगाव येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या श्री साध्वी बन्नोमाँ यांच्या १२९ व्या यात्रा उत्सवाला बुधवार, दि. २८ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. रविवार, दि. १ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या यात्रेत संदल, छबीना, कुस्त्यांचा जंगी हगामा, कव्वालीचा मुकाबला आणि तमाशांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रेच्या पहिल्या दिवशी बुधवारी (दि. २८) संदल, गुरुवारी (दि. २९) छबीना, तर शुक्रवारी (दि. ३०) कुस्त्यांचा जंगी हगामा आणि कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी (दि. ३१) हजेऱ्या व तमाशा, तर रविवारी (दि. १ नोव्हेंबर) तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी होणाऱ्या कव्वालीच्या जंगी मुकाबल्यात मतीन चिस्ती आणि रेश्मा ताज यांच्यात रंगतदार सामना रंगणार आहे. तसेच कुस्तीप्रेमींसाठी जंगी हगाम्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त सौ. मंगला बनसोडे, नितीनकुमार बनसोडे करवडीकर, मालती इनामदार नारायणगावकर, शिवकन्या बडे नगरकर, राणी पुणेकर आणि पांडुरंग मुळे यांच्या तमाशांचे कार्यक्रम होणार आहेत. यात्रा शांततेत आणि उत्साहात पार पडावी, यासाठी पंच कमिटी व समस्त ग्रामस्थांच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. यात्रेदरम्यान कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालू दिले जाणार नाहीत. तसेच पंच कमिटीच्या परवानगीशिवाय व्यापाऱ्यांनी दुकाने लावू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. कुस्तीच्या हगाम्यात विजयी होणाऱ्या मल्लांनाच इनाम दिले जाणार असून, हगामा संपल्यानंतर कोणालाही इनाम दिले जाणार नाही, असे पंच कमिटीने स्पष्ट केले आहे. तसेच ऐनवेळी कार्यक्रमात बदल करण्याचा अधिकार पंच कमिटीने राखून ठेवला आहे. श्री साध्वी बन्नोमाँ यात्रा उत्सवात भाविक, कुस्तीप्रेमी आणि कलाप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पंच कमिटी व समस्त ग्रामस्थ, बोधेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.