-देविदास कणखर, विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांची भेट; हळद व तुरीची उभी पिके वाचविण्यासाठी पेनटाकळी प्रकल्पातून पाणी देण्याची मागणी
अंकुश पाटील (चिखली) : पेनटाकळी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असतानाही चिखली तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना उभ्या पिकांसाठी पाणी मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. लाखो रुपये खर्च करून लागवड केलेली हळद, तूर तसेच जनावरांसाठीची चारा पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. ही पिके वाचविण्यासाठी प्रकल्पातील उपलब्ध पाणी शेतीसाठी द्यावे, या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेतली. यावेळी तहसील कार्यालयातील सभागृहात सविस्तर बैठक झाली. या बैठकीला परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. या प्रश्नावर वरिष्ठांशी चर्चा करण्यात आली असून, शेतकऱ्यांना न्याय देण्यात येईल, असे आश्वासन नायब तहसीलदार श्री. गायकवाड यांनी दिले.



वरखेड, मंगरूळ नवघरे, घानमोड, मानमोड, डोंगरगाव, नायगाव खुर्द, पेन सावंगी, नायगाव बुद्रुक, भोरसा भोरसी, पांढरदेव आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी पेनटाकळी प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या आहेत. धरणासाठी जमिनी दिल्यानंतर उर्वरित क्षेत्रात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना धरणातील पाणी डोळ्यांसमोर असूनही आपल्या पिकांना सिंचन करता येत नाही. त्यामुळे ‘धरण उशाला, कोरड घशाला’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच कर्ज काढून आणि पदरमोड करून लागवड केलेली हळद व तूर पाण्याअभावी संकटात सापडली आहे. पिके वाया गेल्यास कर्जफेड कशी करायची, पुढील हंगामासाठी भांडवल कुठून आणायचे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असे प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहेत.
नदीपात्रात पाणी सोडणार, तर धरणग्रस्तांच्या पिकांना का नाही?
पेनटाकळी व कोराडी प्रकल्पांतून खरीप पिकांसाठी पाणी सोडण्यास परवानगी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर नदीपात्रात पाणी सोडले जाणार असेल, तर पेनटाकळी प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना स्प्रिंकलर व ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्यास परवानगी का देऊ नये, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी राखीव साठा सुरक्षित ठेवून भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे आणि शेतीसाठी आवश्यक तेवढे पाणी देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
वीजजोडण्या पूर्ववत करून पाणीवाटपाचे नियोजन करा
पाणी उपसा करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक परवानग्या तातडीने द्याव्यात, संबंधित शेतकऱ्यांच्या मोटारपंपांच्या खंडित विद्युत जोडण्या पूर्ववत करण्यासाठी महावितरणला निर्देश द्यावेत आणि गावनिहाय न्याय्य पाणीवाटपाचे नियोजन करावे, अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन लेखी आदेश निर्गमित करावेत आणि त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या वेळी नंदकुमार आंभोरे, अनिल कणखर, विनोद कणखर, स्वप्नील सोळंकी, अनंथा भगत, मंगेश खरात, पुरुषोत्तम काळे, संतोष शेळके, औचितराव वाघमारे, खुशालराव कणखर, भागवत म्हस्के, सुनील कणखर, शुभम कणखर, गणेश आंभोरे, पवन कणखर, रमेश कणखर, नितीन गवळी, वैभव कणखर, आकाश जाधव यांच्यासह चिखली तालुक्यातील धरणग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिके वाया गेली तर कर्ज कसे फेडायचे?
हळद व तुरीच्या लागवडीसाठी बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि मशागतीवर शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे आधीच नुकसान झाले असताना आता उभी पिके पाण्याअभावी वाया गेली, तर घेतलेले कर्ज कसे फेडायचे, पुढील हंगामासाठी पैसा कुठून आणायचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे उभी पिके वाचविण्यासाठी प्रशासनाने तातडीने पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.