-अखिल भारत हिंदू महासभेचा स्थानिक नागरिकांना जाहीर पाठिंबा; प्रस्तावित प्रकल्प रद्द करून अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी
आळंदी (अर्जुन मेदनकर) : भीमाशंकरच्या समृद्ध आणि जैवविविधतेने नटलेल्या जंगल क्षेत्रातील तब्बल ६०० एकर जमीन अधिग्रहित करून तेथे विद्युत प्रकल्प उभारण्याच्या हालचालींना विरोध सुरू झाला आहे. या प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांसह तालुक्यातील नागरिकांनी भूमिका घेतली असून, अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष वैभवराज रौंदळ यांनी स्थानिकांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा दिला आहे.
यासंदर्भात वैभवराज रौंदळ यांनी पंतप्रधान, केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून प्रस्तावित प्रकल्प तातडीने रद्द करावा आणि तो अन्यत्र स्थलांतरित करावा, अशी मागणी केली आहे.
भीमाशंकरचे पर्यावरण व जैवविविधता धोक्यात
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील भीमाशंकरचे जंगल हे केवळ निसर्गरम्य ठिकाण नसून समृद्ध जैविक परिसंस्था आहे. या जंगलात दुर्मिळ प्राणी, पक्षी आणि विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात. हा परिसर महाराष्ट्राचा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. वैभवराज रौंदळ यांनी निवेदनात नमूद केले आहे की, भीमाशंकर परिसरातील ६०० एकर जंगल तोडून विद्युत प्रकल्प उभारल्यास मोठ्या प्रमाणावर खोदकाम आणि वृक्षतोड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडून पर्यावरणाचे मोठे नुकसान होऊ शकते. ही हानी भरून काढणे कठीण ठरेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
स्थानिकांच्या भावनांचा आदर करण्याची मागणी
भीमाशंकर परिसरातील गावांमधील नागरिकांचा या प्रकल्पाला विरोध असल्याचे रौंदळ यांनी म्हटले आहे. स्थानिकांना हा प्रकल्प आपल्या भागात नको असल्यास प्रशासनाने त्यांच्यावर तो लादू नये. नागरिकांच्या विरोधाची दखल घेऊन त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रकल्प पडीक किंवा वाळवंटी जमिनीवर उभारण्याचा पर्याय
महाराष्ट्राला गड-किल्ले, समृद्ध संस्कृती आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा नैसर्गिक वारसा लाभला आहे. हा वारसा जतन करण्याची गरज अधोरेखित करत, हरित पट्ट्यात प्रकल्प उभारण्याऐवजी शासनाने तो पडीक किंवा वाळवंटी जमिनीवर उभारण्याचा पर्याय विचारात घ्यावा, अशी मागणी रौंदळ यांनी केली आहे. त्यामुळे विकास साधतानाच पर्यावरणाचे संरक्षण करता येईल, असे त्यांनी नमूद केले. “सह्याद्रीच्या कुशीतील निसर्ग, पर्यावरण आणि जीवसृष्टीचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे प्रशासनाने भीमाशंकर येथील प्रस्तावित विद्युत प्रकल्प तातडीने रद्द करावा,” अशी मागणी वैभवराज रौंदळ (राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारत हिंदू महासभा) यांनी केली आहे.