– शेवगावात केदारेश्वर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू; थकीत देणी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याची ग्वाही!
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : अत्यंत संघर्षातून उभी राहिलेली केदारेश्वर सहकारी साखर कारखाना ही केवळ एक संस्था नसून, या परिसरातील शेतकरी, ऊसतोडणी कामगार आणि त्यांच्या पुढील पिढ्यांच्या भविष्याशी जोडलेली नाळ आहे. ही संस्था टिकवण्यासाठी सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून आपल्या शेतातील ऊस आपल्याच कारखान्याला द्यावा, असे आवाहन कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांनी केले.
स्वर्गीय बबनराव ढाकणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गव्हाणपूजन करून हंगामाचा अधिकृत प्रारंभ करण्यात आला.
कारखान्याचे उपाध्यक्ष माधव काटे यांनी प्रास्ताविकात मागील दहा ते बारा वर्षांतील गळीत हंगामातील अडचणींचा आढावा घेतला. मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे यंदाचा हंगाम अधिक आव्हानात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावर भाष्य करताना प्रतापराव ढाकणे म्हणाले की, “मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे जलसाठे भरल्याने आगामी काळात पाण्याची टंचाई भासणार नाही, अशी आशा होती. परंतु, यंदा पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचे संकट ओढवले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही कारखाना सक्षमपणे चालवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.”
शेतकऱ्यांची देणी देण्यास सुरुवात करणार: दिवाळी गोड करण्याचा शब्द
कारखान्याच्या थकीत देयकांबाबत बोलताना ढाकणे यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. मागील हंगामातील थकीत देणी देण्यास लवकरच सुरुवात केली जाईल, असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना कारखान्यावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. चालू हंगामातही शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी व्यवस्थापन कटिबद्ध राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच, ऊसतोडणी व वाहतुकीचे नियोजन करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा शब्द त्यांनी यावेळी दिला.
विस्तारीकरणाच्या स्पर्धेमुळे साखर उद्योग अडचणीत
महाराष्ट्रातील साखर कारखानदारीवर चिंता व्यक्त करताना ढाकणे म्हणाले की, अनेकांनी गाळप क्षमता वाढवली, पण त्यानुसार ऊसक्षेत्र वाढले नाही. यामुळे ऊस मिळवण्यासाठी स्पर्धा लागली असून, ऊस पळवापळवी आणि वजनातील अनियमिततेसारखे प्रश्न निर्माण झाले आहेत. या स्पर्धेचा फटका शेतकरी आणि ऊसतोडणी कामगारांना बसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हंगाम कमी कालावधीत संपल्यास कामगारांच्या रोजगारावर परिणाम होतो; त्यामुळे शेतकरी, कामगार आणि कारखाना या तिघांचेही हित जपणारी भूमिका घेतली पाहिजे.
केदारेश्वर कारखाना हा राजकारणाचा अड्डा नसून परिसराच्या विकासाचे केंद्र आहे. शेवगावच्या पूर्व भागातील सिंचन प्रश्न आणि बोधेगावला स्वतंत्र तालुका करण्याच्या मागणीवरही त्यांनी जोर दिला. जिल्हा सहकारी बँकेच्या कारभारात शेतकरी सभासदांचे हित अग्रस्थानी असावे आणि हा लढा विचारांचा व हक्कांचा असल्याचे प्रतापकाका ढाकणे यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी अध्यक्ष प्रतापराव ढाकणे, अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे, संचालक प्रकाश घनवट, त्रिंबक चेमटे, शाहदेव पातकळ, सिद्धाराम हिरमुके, अक्षय हिरमुके, अनिल मानुरकर, कल्लेश्वर कोटर्गे, हिराचंद माळी, संजू कलबुर्गी, स्वरूप खांबेकर, कमलेश संचेती, जितेंद्र छाजेड, हरविंदर सिंग प्रधान, कमलेश गोयल यांच्यासह ज्येष्ठ संचालक, आजी-माजी अधिकारी, विभागप्रमुख, कर्मचारी, शेतकरी सभासद आणि ऊसतोडणी कामगार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्यकारी संचालक किरण शेलार यांनी आगामी हंगामाच्या तयारीचा आढावा घेतला. प्रास्ताविक माधव काटे यांनी केले, सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी तर आभार डॉ. प्रकाश घनवट यांनी मानले. यावेळी अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांच्यासह कारखान्याचे संचालक, अधिकारी, शेतकरी सभासद आणि ऊसतोडणी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.