-‘क्यूआर कोड’ दाखवा आणि खत मिळवा; रांगेत उभे राहण्याच्या त्रासातून शेतकऱ्यांची होणार सुटका
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : अनुदानित रासायनिक खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांसमोर तासनतास रांगेत उभे राहण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर येणार नाही. केंद्र शासनाच्या ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (एफएफएस) या मोबाईल-आधारित डिजिटल प्रणालीची अंमलबजावणी सिंदखेडराजा तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात सुरू झाली आहे. या प्रणालीचा शुभारंभ साखरखेर्डा येथील प्रगत शेतकरी कृषी सेवा केंद्र आणि तिरुपती कृषी सेवा केंद्र येथे करण्यात आला.
यावेळी तालुका कृषी अधिकारी जितेंद्र सानप, सचिन खरात, कृषी सेवा केंद्र चालक दिलीप लखोटिया आणि महाधन कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रणालीद्वारे सावंगी माळी येथील शेतकरी गजानन मोतीराम काळे आणि वरुडी येथील प्रकाश जनार्दन गवई यांना खतविक्री करून प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. या आधुनिक प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून खतांचे बुकिंग करता येणार आहे. त्यानंतर कृषी सेवा केंद्रात जाऊन क्यूआर कोड दाखवल्यानंतर खत खरेदी करता येईल. यामुळे खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासोबतच शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम वाचण्यास मदत होणार आहे. सध्या कृषी सेवा केंद्रांवर ई-पॉस मशीनच्या माध्यमातून अनुदानित खतांची विक्री केली जाते. मात्र, खतांची उपलब्धता, वितरणातील पारदर्शकता आणि शेतकऱ्यांना योग्य वेळी खते मिळावीत, या उद्देशाने केंद्र शासनाने एफएफएस ही मोबाईल-आधारित डिजिटल प्रणाली विकसित केली आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर येथे, तर दुसऱ्या टप्प्यात राज्यातील नऊ जिल्ह्यांत ही प्रणाली लागू करण्यात आली. आता तिसऱ्या टप्प्यात २२ ऑक्टोबरपासून बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील उर्वरित भागांतही ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येत आहे.
मोबाईलवरच तपासा खतांची उपलब्धता!
या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी अधिक सुलभ पर्याय उपलब्ध होणार आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून जवळच्या खत विक्रेत्याकडील उपलब्ध साठ्याची माहिती घेऊन खतांचे बुकिंग करता येईल. बुकिंगनंतर शेतकऱ्याला युनिक क्यूआर कोड आणि टोकन क्रमांक मिळेल. हा कोड संबंधित खत विक्रेत्याला दाखवून खरेदीची प्रक्रिया पूर्ण करता येईल. विशेष म्हणजे, शेतातील क्षेत्रफळ आणि निवडलेल्या पिकाच्या आधारे आवश्यक खतांच्या शिफारशींची माहितीही ॲपवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पिकांना आवश्यक असलेल्या खतांचे नियोजन करणे शेतकऱ्यांना सोपे होईल. खत वितरणावर नियंत्रण ठेवण्यासोबतच संभाव्य काळाबाजार आणि अनियमिततेला आळा घालण्यासाठीही या प्रणालीची मदत होऊ शकते.
शेतकऱ्यांनी नोंदणीपूर्वी ही काळजी घ्यावी
एफएफएस प्रणालीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक पूर्वतयारी करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी आधार कार्डाशी मोबाईल क्रमांक संलग्न असल्याची खात्री करून घ्यावी. संबंधित शेतकऱ्याचा फार्मर आयडी, आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक आणि ओटीपीच्या माध्यमातून ॲपवरील नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तसेच गाव, जिल्हा, सर्व्हे क्रमांक, जमिनीचे क्षेत्रफळ आणि पीक यासंबंधीची माहिती भरून तिची पडताळणी करावी लागणार आहे. शेतकऱ्याऐवजी दुसरी व्यक्ती खत खरेदी करण्यासाठी जाणार असल्यास त्या प्रतिनिधीकडे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि आवश्यक क्यूआर कोड असणे गरजेचे असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
क्यूआर कोड ७२ तासांपर्यंत वैध
ॲपवर खतांचे बुकिंग केल्यानंतर मिळणारा युनिक क्यूआर कोड किंवा टोकन क्रमांक केवळ तीन दिवस म्हणजेच ७२ तासांपर्यंत वैध राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बुकिंग केल्यानंतर निर्धारित कालावधीत संबंधित खत विक्रेत्याकडून खत खरेदी करणे आवश्यक आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या नवीन डिजिटल प्रणालीचा लाभ घेऊन ॲपवर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी आणि आधार कार्डाशी मोबाईल क्रमांक संलग्न असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी जितेंद्र सानप यांनी केले आहे. कृषी विभागातील अधिकारी आणि खत विक्रेत्यांनीही शेतकऱ्यांमध्ये व्यापक जनजागृती करून त्यांना आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.