-आरडाओरड ऐकून परिसरातील महिला व युवक धावले; नागरिकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : येथील प्रभाग क्रमांक सहामध्ये एका महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण करीत अंगावरील दागिने काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
साखरखेर्डा येथील श्री प्रल्हाद महाराज संस्थानमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या निर्मला रामचंद्र पंचाळ (वय ६०) या स्वयंपाकाचे काम आटोपून घरी परतल्या होत्या. घरात त्या एकट्याच असल्याची संधी साधून याच प्रभागातील शेख सोरभ शेख रहीम ऊर्फ शेरा हा तोंडावर काळा रुमाल बांधून चोरीच्या उद्देशाने घरात घुसला. त्यानंतर त्याने घराचा दरवाजा आतून बंद करून निर्मला यांना मारहाण केली. त्यांना स्वयंपाकघरात नेऊन पायपुसणी तोंडात कोंबली आणि गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. महिलेने आरडाओरड केल्याने परिसरातील महिला आणि युवक मदतीसाठी धावून आले. या झटापटीत आरोपीने महिलेच्या नाकातील नथ काढली; मात्र झटापटीदरम्यान ती खाली पडली. नथ उचलण्याचा प्रयत्न सुरू असताना महिलेने दरवाजा उघडला. त्यावेळी आरोपीने पुन्हा महिलेवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी जमलेल्या महिलांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
हा प्रकार गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास साखरखेर्डा येथील प्रभाग क्रमांक सहामध्ये घडला. साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार युवराज रबडे यांनी निर्मला पंचाळ यांच्या तक्रारीवरून शेख सोरभ शेख रहीम ऊर्फ शेरा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३३, २९६, ११५(२) आणि ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. दरम्यान, यापूर्वी शिक्षक कॉलनीत दोन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. तोंडावर काळा रुमाल बांधून चोरी करणाऱ्या चार आरोपींचा पोलीस शोध घेत असतानाच, पुन्हा त्याच पद्धतीने तोंडावर काळा रुमाल बांधून शेख सोरभ शेख रहीम ऊर्फ शेरा याने घरात घुसून हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी जबरी चोरी आणि खुनासारखे गुन्हे दाखल असल्याची माहिती देण्यात आली आहे.