-ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांच्या प्रश्नांना लेखणीद्वारे वाचा फोडल्याबद्दल कार्याची दखल; जानेवारी २०२७ मध्ये मेहकर येथे पुरस्कार वितरण
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : लोकसेवा शिक्षण व क्रीडा बहुउद्देशीय संस्था, मेहकर, दैनिक न्यायहक्क समताशाही आणि साप्ताहिक जांनेफळ एक्सप्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार सोहळ्यासाठी पांगरी काटे, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा येथील पत्रकार समाधान रामकृष्ण सरकटे यांची ‘राज्यस्तरीय न्यायहक्क समताशाही आदर्श पत्रकारिता पुरस्कार २०२७’ साठी निवड करण्यात आली आहे.
संस्थेचे मुख्य संपादक अशोक शेजूळ आणि पुरस्कार निवड समितीचे अनिल चव्हाण यांनी १२ ऑक्टोबर रोजी या पुरस्काराची घोषणा केली. गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. समाधान सरकटे हे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांच्या व्यथा आपल्या लेखनातून मांडून त्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम सातत्याने करतात. पाणीटंचाई, कोरडा दुष्काळ आणि खरीप हंगामातील पीक परिस्थिती यांसारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या लेखनातून ग्रामीण समाजाच्या समस्या मांडल्या आहेत. त्यांच्या या समाजाभिमुख कार्याची दखल घेऊन त्यांची राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा जानेवारी २०२७ मध्ये मेहकर, जि. बुलढाणा येथे संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात येणार आहे. समाधान सरकटे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, पत्रकारिता क्षेत्रात ही अभिमानास्पद बाब मानली जात आहे.