-अमरावती विभागातून द्वितीय क्रमांक पटकावत कु. श्रावणी चवरे हिने मिळविले घवघवीत यश; विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
चिखली (राजेंद्र घुबे) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, यवतमाळ आणि जिल्हा क्रीडा परिषद, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय मैदानी स्पर्धा १५ ऑक्टोबर रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेत जानकी देवी उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. श्रावणी रामदास चवरे हिने ३,००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याचा मान मिळविला आहे.
कु. श्रावणी चवरे हिने विभागीय स्तरावरील स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. तिच्या या यशामुळे गावासह विद्यालयाच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मेहनत आणि सरावातील सातत्याच्या जोरावर तिने हे यश मिळविले. तिच्या या कामगिरीमुळे विद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली असून, परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात पुढे येऊन आपल्या गुणवत्तेच्या बळावर मोठे यश संपादन करावे, यासाठी श्रावणीचे यश प्रेरणादायी ठरले आहे. कु. श्रावणी चवरे हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल भारत शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेनफडराव ऊर्फ दादासाहेब घुबे, विद्यालयाचे सचिव प्रा. उद्धवराव घुबे, क्रीडा शिक्षक पंजाबराव गुंजकर, रामेश्वर कऱ्हाडे, प्राचार्य बबनराव लांडगे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.