-लोणार सरोवरातील वाढत्या पाणीपातळीमुळे ऐतिहासिक व धार्मिक स्थळांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर; तहसीलदारांना निवेदन सादर
लोणार (वाजिद खान) : जागतिक कीर्तीच्या लोणार सरोवरातील वाढत्या पाणीपातळीमुळे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या माँ कमळजा माता मंदिराच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांना सकल मुस्लिम समाज बांधव, लोणार यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. यासंदर्भात १४ ऑक्टोबर २०२६ रोजी लोणारच्या तहसीलदारांकडे निवेदन सादर करून धार्मिक स्थळांचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली.
लोणार सरोवर परिसरातील वाढत्या पाणीपातळीमुळे माँ कमळजा माता मंदिर परिसरात पाणी साचले असून, भाविकांना दर्शनासाठी जाताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राजेश मापारी, साहेबराव पाटोळे, विकास मोरे, सुरेश वाठोरे आणि गोपी आखाडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला सकल मुस्लिम समाजाने जाहीर पाठिंबा देत धार्मिक स्थळांचे जतन व संरक्षण करण्याची भूमिका मांडली. दरम्यान, लोणार सरोवरातील सर्वेक्षण क्रमांक २६ मधील ऐतिहासिक गैबनशाह वली दरगाह परिसरातही वाढत्या पाणीपातळीमुळे पाणी साचले असून, दरगाहकडे जाणारा मार्ग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या धार्मिक स्थळाच्या संरक्षणाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर दरगाह परिसरातील पाण्याचा प्रश्न सोडवून भाविकांसाठी मार्ग मोकळा करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली.
धार्मिक स्थळांच्या संरक्षणासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा
माँ कमळजा माता मंदिर आणि गैबनशाह वली दरगाह ही दोन्ही धार्मिक स्थळे भाविकांच्या श्रद्धेची केंद्रे आहेत. त्यामुळे या स्थळांच्या संरक्षणासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात. तसेच वाढत्या पाणीपातळीमुळे निर्माण झालेल्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी सकल मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली. या प्रकरणी प्रशासन काय निर्णय घेते आणि धार्मिक स्थळांच्या संरक्षणासाठी कोणत्या उपाययोजना राबवते, याकडे लोणारमधील नागरिक आणि भाविकांचे लक्ष लागले आहे.