-थांग-ता मार्शल आर्ट स्पर्धेत विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी; क्रीडा शिक्षक आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाला यश
चिखली (अंकुश पाटील) : अमरावती येथे दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या मार्शल आर्ट थांग-ता स्पर्धेत सिंधुदुर्ग विद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या स्पर्धेत विद्यालयाच्या चार खेळाडूंनी प्रथम स्थान मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली, तर खुशी मोरे हिने द्वितीय स्थान पटकावले.
या स्पर्धेत समीक्षा दिलवाले, आकर्ष कडूबा राठोड, ऋषिकेश म्हस्के आणि सूरज नंदू राठोड यांनी प्रथम स्थान मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेत धडक मारली. तसेच खुशी मोरे हिने द्वितीय क्रमांक मिळवत आपल्या खेळातील कौशल्याची छाप पाडली. खेळाडूंनी मिळवलेल्या या यशामुळे सिंधुदुर्ग विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीला नवी उंची मिळाली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे क्रीडा शिक्षक बंगाळे सर, सुरडकर सर तसेच चिखली येथील प्रशिक्षक फईम सौदागर सर यांचे मार्गदर्शन आणि परिश्रम महत्त्वाचे ठरले. खेळाडूंच्या या यशाबद्दल विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि क्रीडाप्रेमींकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतही हे खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करून विद्यालयाचा आणि परिसराचा नावलौकिक वाढवतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.