- हेक्टरी एक लाख रुपयांच्या भरपाईसाठी शेतकरी संघटनांचे प्रशासनाला निवेदन
चिखली (अंकुश पाटील) : राज्य शासनाने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची आगाऊ मदत ही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ‘चॉकलेट मदत’ असून, ती आम्हाला अमान्य आहे. त्याऐवजी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी ‘क्रांतिकारी शेतकरी संघटना’ आणि ‘शेतकरी संघटना’ यांच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या नावे चिखलीच्या तहसीलदारांकडे निवेदन सादर करण्यात आले. या वेळी शेतकरी संघटनांचे देवीदास कणखर, विनायक सरनाईक आणि इतर पदाधिकारी व शेतकरी नेते उपस्थित होते. शेतकऱ्यांनी पाच हजार रुपयांची तुटपुंजी मदत नाकारत, प्रतीकात्मक निषेध म्हणून प्रशासनाला उटणे, साबण आणि फराळाचे साहित्य पाठवून दिले. त्यामुळे हा विषय परिसरात चांगलाच चर्चेचा ठरला आहे.
निवेदनात शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचा उल्लेख करून पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत. पाच हजार रुपयांची मदत अमान्य असून, दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीपोटी प्रतिहेक्टरी एक लाख रुपये मदत त्वरित द्यावी. पीकविमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या हक्काची विमा रक्कम तत्काळ त्यांच्या खात्यात जमा करावी. पशुधनासाठी चारा टंचाई निर्माण होण्यापूर्वी सोयाबीन कुटाराचा दर निश्चित करून त्याची खरेदी करावी. तसेच, चारा छावण्यांवर होणाऱ्या खर्चाऐवजी पशुपालकांच्या बँक खात्यांत थेट चारा अनुदान जमा करावे. राज्यातील सर्व आमदारांनी आपले एक ते दोन महिन्यांचे वेतन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी द्यावे. थकीत कर्जाबाबत सवलत देऊन शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कर्जमुक्त करणारी ठोस योजना राबवावी. केवायसी, वारस नोंदी किंवा तांत्रिक अडचणींमुळे पीककर्जापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांची बैठक घेऊन त्यासाठी कालमर्यादा निश्चित करावी, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
‘भीक नको, हवे घामाचे दाम!’
शेतकरी नेते शरद जोशी यांच्या ‘भीक नको, हवे घामाचे दाम’ या विचारांची आठवण करून देत शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांच्या घरची दिवाळी गोड होऊ शकत नाही. कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून देशाची अन्नाची गरज भागवणाऱ्या शेतकऱ्यांवर आज स्वतःच्या हक्कासाठी वाट पाहण्याची वेळ आली आहे.” शासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.
निवेदनावर शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष देविदास किसनराव कणखर, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक, मुरली महाराज येवले, गणेश पाटील थुट्टे, गजानन पंडित, अरुण नेमाने, अच्युतराव वाघमारे, भीमराव हिवरकर आणि सुधाकर तायडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.