अपडेट
पुण्यातील फार्म हाऊसवर आजच होणार नाना पाटेकर यांच्यावर अंत्यसंस्कार
अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गुरुवारी पुण्याच्या वेशीवर (बाहेर) असलेल्या त्यांच्या फार्म हाऊसवर अंत्यसंस्कार केले जातील. नाना पाटेकर यांच्या ‘नाम फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गणेश थोरात यांनी सांगितले की, नानांचे पार्थिव सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास पुण्यात आणले जाईल. त्यानंतर पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल. नाना पाटेकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह काही वरिष्ठ मंत्री आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकार पुण्यात दाखल होणार आहेत. हे सर्व मान्यवर सायंकाळी सात वाजेपर्यंत पुण्यात पोहोचतील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
– गोव्यातील राहत्या घरी हृदयविकाराचा झटका; नाना पाटेकर यांची वयाच्या ७५ व्या वर्षी एग्झिट!
– अवघ्या १३ व्या वर्षी संघर्षाची सुरुवात, अन् अभिनयाने गाजवले भारतीय सिनेमाचे मैदान; नानांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा! पुण्यातील डोणजे गाव येथे शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
– अंगभूत अभिनय आणि तडाखेबंद संवादफेकीचा सुवर्णकाळ ओसरला; ३ राष्ट्रीय पुरस्कार व ‘पद्मश्री’ विजेत्या अवलिया कलाकाराच्या निधनाने देश हळहळला!
गोवा / मुंबई (धम्मप्रिया कांबळे) : अष्टपैलू अभिनय, तडाखेबंद संवादफेक आणि सामाजिक बांधिलकी जपणारे भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते विश्वनाथ ऊर्फ नाना पाटेकर (वय ७५) यांचे गुरुवारी (८ ऑक्टोबर २०२६) पहाटे गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. गोव्यातील राहत्या घरी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीवर आणि रसिक प्रेक्षकांवर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटना घडली तेव्हा नाना पाटेकर यांच्या गोव्यातील निवासस्थानी त्यांचे मित्र आणि केअरटेकर उपस्थित होते. रात्री २:३० वाजेच्या सुमारास नाना यांनी अस्वस्थ वाटत असल्याचा संदेश (मॅसेज) एका मित्राला पाठवला होता. मात्र, रात्र असल्याने मित्राने तो संदेश लगेच पाहिला नाही. पहाटेच्या सुमारास फोनवर संपर्क साधल्यानंतर मित्र आणि केअरटेकर तातडीने नाना यांच्या घरी पोहोचले. त्या वेळी त्यांना प्रचंड घाम येत होता आणि प्रकृती वेगाने खालावत होती. थोड्याच वेळात ते बेशुद्ध झाले.
तातडीने रुग्णवाहिका आणि आणीबाणी वैद्यकीय पथकाला (इर्जन्सी टीम) बोलावण्यात आले. वैद्यकीय पथक घरी पोहोचले तेव्हा नाना पूर्णपणे प्रतिसाद देत नव्हते. पथकाने त्वरित ‘कार्डियाक मसाज’ आणि ‘CPR’ देण्यास सुरुवात केली. सुमारे ४५ मिनिटे अथक प्रयत्न केल्यानंतरही त्यांच्यात कोणतीही हालचाल झाली नाही.
पहाटे ४:२० ते ४:३० च्या दरम्यान त्यांना बांबोळी येथील मणिपाल रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णालयातील ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी नाना पाटेकर यांना मृत घोषित केले. सकाळी ५:२० वाजता त्यांच्या निधनाची अधिकृत नोंद करण्यात आली. या घटनेनंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार मेडिको-लीगल केस (MLC) नोंदवण्यात आली असून पुढील शवविच्छेदन (Post-Mortem) करण्यात येत आहे.
नाना पाटेकर यांच्यावर पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील डोणजे गाव येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार होणार आहेत. नाना पाटेकर यांची अंतिम इच्छा होती की, त्यांचे शेवटचे कार्य हे पुणे डोणजे येथील शेतामध्येच व्हावे. त्यानुसार पुणे डोणजे गावतच अंत्यसंस्कार होणार आहेत. ‘नानाची वाडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच फार्महाऊसमध्ये नाना पाटेकर अनेक वर्षांपासून कुटुंबासह राहत होते. हे फार्महाऊस त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे ठिकाण होते. नाना पाटेकर यांनी या ठिकाणी शेती सुरू केली होती. त्याचे व्हिडीओदेखील अनेकदा समोर आले होते.
तीन राष्ट्रीय पुरस्कार आणि ‘पद्मश्री’ सन्मान
१ जानेवारी १९५१ रोजी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा येथे जन्मलेल्या नाना पाटेकर यांनी १९७८ मध्ये ‘गमन’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. आपल्या चाळीस वर्षांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी १०० हून अधिक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये काम केले.
-
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार:
- १९८९ – ‘परिंदा’ (सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता)
- १९९४ – ‘क्रांतिवीर’ (सर्वोत्कृष्ट अभिनेता)
- १९९६ – ‘अग्निसाक्षी’ (सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता)
-
इतर सन्मान: त्यांना चार फिल्मफेअर पुरस्कार आणि दोन फिल्मफेअर मराठी पुरस्कार मिळाले. भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल २०१३ मध्ये केंद्र सरकारतर्फे ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
-
नावाजलेले चित्रपट: ‘अंकुश’, ‘प्रतिघात’, ‘प्रहार’, ‘तिरंगा’, ‘खामोशी: द म्युजिकल’, ‘अब तक छप्पन’, ‘अपहरण’, ‘राजनीति’, ‘वेलकम’ आणि मराठीतील ‘नटसम्राट’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अजरामर झाल्या.
संघर्षातून घडलेले व्यक्तिमत्त्व
नाना पाटेकर यांचे बालपण अत्यंत गरिबी आणि संघर्षात गेले. वडील गजानन पाटेकर आणि आई निर्मला पाटेकर यांच्या या पुत्राला कौटुंबिक परिस्थितीमुळे अवघ्या १३ व्या वर्षी कामाला लागावे लागले. चुनाभट्टी येथे चित्रपटाचे पोस्टर्स रंगवण्याचे काम ते करत असत; त्यासाठी दिवसाला ८ किलोमीटर पायपीट करून महिन्याला अवघे ३५ रुपये मजुरी मिळायची. हाच जीवनातील संघर्ष पुढे त्यांच्या अभिनयातील तीव्रतेत आणि सहजतेत दिसून आला.
त्यांचा विवाह नीलकांती पाटेकर यांच्याशी झाला होता. त्यांना मल्हार हा मुलगा आहे. (यापूर्वी त्यांच्या दुर्वासा या पहिल्या मुलाचे अवघ्या अडीच वर्षांचे असताना निधन झाले होते.)
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून श्रद्धांजली
नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकसंदेशात म्हटले, “नाना पाटेकर यांच्यासारखी अभिनय क्षेत्रातील खोली, स्वतंत्र ओळख आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व अत्यंत दुर्मिळ होते. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत अष्टपैलुत्व आणि सर्जनशीलता दिसून आली. त्यांनी साकारलेल्या भूमिका अनेक पिढ्यांच्या लक्षात राहतील.”
नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय कलाविश्व एका अष्टपैलू, संवेदनशील आणि स्पष्टवक्त्या कलाकाराला मुकले आहे.
‘नाम’ फाउंडेशनच्या माध्यमातून अनेकांना मदत
नाना पाटेकर यांनी ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत केली. त्याशिवाय याच संस्थेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे केली. नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी रंगभूमी ते बॉलिवूड अशी मुशाफिरी करणारा दमदार अभिनेता हरपल्याची भावना व्यक्त व्यक्त केली जात आहे.