-चाळीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरिपाची पिके वाळली; राष्ट्रवादी काँग्रेसकडून तहसील कार्यालयात निवेदन
चिखली (अंकुश पाटील) : गेल्या चाळीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने चिखली तालुक्यातील खरिपाची पिके पूर्णपणे वाळून गेली आहेत. पेरणीचा खर्चही निघणार नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
या गंभीर परिस्थितीची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, यासाठी चिखली तहसील कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे चिखली तालुक्यात तातडीने ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करून शासकीय मदत लागू करावी, चालू वर्षाचा पीक विमा कोणतीही तांत्रिक अडवणूक न करता त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, तसेच सुकलेल्या पिकांचे महसूल व कृषी विभागामार्फत तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक दिलासा आणि न्याय मिळावा, हीच आमची ठाम मागणी आहे. मागण्यांची पूर्तता न झाल्यास शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब पवार, शहराध्यक्ष रवींद्र भाऊ तोडकर, जिल्हा उपाध्यक्ष गजानन भाऊ वायाळ, रामभाऊ खेडेकर, डॉ. विकास मिसाळ, प्रतापसिंग पवार, सुनील खेडेकर, सतीश भुतेकर, भिकनराव भुतेकर, प्रशांत डोंगरदिवे, निंबाराव देशमुख, शेख नईम कुरेशी, दिलीप महाजन, रामेश्वर घाडगे, राजू नेमाने, संजय सावंत, तुकाराम सोळंके, नासीर कुरेशी, अमोल भुतेकर, किसन काळे, तुकाराम सापते, गणेश देशमुख, प्रसाद पाटील आणि अक्षय सुरसे उपस्थित होते.