-कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचा पुढाकार; आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान, मढी येथे येणाऱ्या भाविकांच्या सुख-सुविधांचा विचार करून देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवीन प्रवासी बस खरेदी करण्यात आली आहे. भाविक व प्रवाशांच्या वाहतुकीची सुविधा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या या बसचा लोकार्पण सोहळा शनिवारी (दि. १२) सकाळी ९ वाजता लोकप्रिय आमदार मोनिका राजळे यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठलराव मरकड यांनी दिली.
मढी येथील श्री कानिफनाथ देवस्थान हे राज्यातील प्रमुख धार्मिक आणि जागृत देवस्थानांपैकी एक मानले जाते. वर्षभर येथे राज्याच्या विविध भागांतून भाविक दर्शनासाठी येत असतात. विशेषतः यात्रा, धार्मिक उत्सव आणि विविध पर्वकाळात मढी येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते. या काळात भाविकांना प्रवासाच्या सुविधा उपलब्ध करून देताना अनेक अडचणी निर्माण होतात. त्याचा विचार करून देवस्थान ट्रस्टने भाविकांच्या हितासाठी स्वतःची प्रवासी बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. देवस्थानच्या माध्यमातून भाविकांना केवळ धार्मिक सुविधा न देता त्यांच्या प्रवासासह आवश्यक सुख-सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. नव्या बसमुळे देवस्थान परिसरात येणाऱ्या भाविकांना तसेच विविध ठिकाणांहून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः गर्दीच्या काळात प्रवाशांची होणारी गैरसोय कमी करण्यासाठी या बसचा उपयोग होणार आहे. देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवीन बस खरेदी करण्यात आली आहे. देवस्थानच्या उत्पन्नाचा उपयोग भाविकांच्या सोयीसाठी आणि देवस्थानच्या विकासासाठी करण्याच्या दृष्टीने ट्रस्टने घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
शनिवारी लोकार्पण सोहळा
नवीन प्रवासी बसचा लोकार्पण सोहळा शनिवारी, दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे. आमदार मोनिका राजळे यांच्या शुभहस्ते हा सोहळा होणार असून, देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, मान्यवर, ग्रामस्थ आणि भाविक यावेळी उपस्थित राहणार आहेत. या नवीन बस सुविधेचा लाभ भाविकांनी घ्यावा तसेच लोकार्पण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठलराव मरकड यांनी केले आहे.
भाविकांच्या सेवेसाठी ट्रस्टचा पुढाकार
देवस्थानकडे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असताना त्यांच्या मूलभूत सुविधा सक्षम करण्याच्या दृष्टीने नवीन बस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मढी देवस्थानच्या भाविक सेवा व्यवस्थेला आणखी बळकटी मिळणार आहे.