– तुंबलेल्या नाल्या, साचलेली गटारे, घाणीचे उकिरडे यांनी चांगल्या गावाची लाज घातली!
बुलढाणा (ब्रेकिंग महाराष्ट्र टीम) – निष्काम कर्मयोगी संत पू. शुकदास महाराज यांनी स्थापित केलेल्या हिवरा आश्रम (विवेकानंद नगर) या गावाच्या ग्रामपंचायतीने आपल्या निष्क्रिय कारभाराचा कळस गाठला असून, गावात गटारे तुंबून चोहीकडे दुर्गंधी सुटली आहे, घाणीचे उकिरडे साचले आहेत. त्यामुळे पर्यटन व पू. शुकदास महाराजांच्या समाधीदर्शनासाठी येणार्या राज्यभरातील पर्यटक, भाविकांसमोर येथील ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली जात असून, गावाची लाज जात आहे. राज्यात नावारुपाला आलेल्या व संतपदस्पर्शाने पुनीत झालेल्या या गावाची अशी लाज घालवणे ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी सुरू केल्याने, याबद्दल जनमाणसांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. परंतु, या निष्क्रिय पदाधिकार्यांना त्याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे दुर्देवाने दिसून येत आहे. त्याबद्दल तीव्र संताप जनमाणसांतून व्यक्त होत आहे. गावांतील वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून, पूज्यनीय महाराजांनी हे गाव स्थापित केले आहे, याचे भान तरी या पदाधिकार्यांनी ठेवायला हवे, असा सूर उमटत आहे.
हिवरा आश्रम हे गाव आरोग्य, शिक्षण व पर्यटनाचे महत्वपूर्ण केंद्र आहे. खेड्यापाड्यातील हजारो विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. विवेकानंद ज्ञान संकुलातील विविध वसतीगृहांत पाच हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी-विद्यार्थिनी येथे शिक्षणासाठी दाखल आहेत. त्यांच्या भेटीगाठीसाठी राज्यभरातून त्यांचे पालक, नातेवाईक येथे येत असतात. तसेच, विवेकानंद आश्रमाने विकसित केलेल्या हरिहरतीर्थ व विवेकानंद स्मारक या पर्यटन व अध्यात्मिक स्थळांसह पू. शुकदास महाराजांच्या समाधीदर्शनासाठीही मोठ्या प्रमाणात पर्यटक, भाविक दररोजच येथे येत असतात. या भाविक व पर्यटकांना गावातील घाणीचे ओंगाळवाणे प्रदर्शन होत असून, संपूर्ण गावाची, खास करून ग्रामपंचायत पदाधिकारी यांची लाज जात आहे.
याबाबत अनेक सुज्ञ नागरिकांनी व्हॉटसअप तसेच वैयिक्तक बोलून घाण-कचरा स्वच्छता, नाल्यांची सफाई याबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याकडे सूचना केली आहे. परंतु, या सूचनांना धाब्यावर बसवून जनमताचा अनादर करण्याचे काम हे पदाधिकारी करत आहेत. गावात नाल्या तुंबल्या असून, त्याचा घाण वास चोहीकडे पसरून दुर्गंधी सुटलेली आहे. उकिरडे साचले असून, त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. हिवरा आश्रम गावाच्या ग्रामपंचायतीच्या इतिहासात इतके निष्क्रिय प्रशासन यापूर्वी कधीही अस्तित्वात आलेले नाही. गावाची लोकसंख्या सातत्याने वाढत असून, त्या तुलनेत घनकचरा व्यवस्थापन, आणि नालेसफाई यांचे गावात तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच, सचिव व इतर पदाधिकारी यांनी जनभावनेचा आदर करून तातडीने उकिरडे व नाल्या साफ कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.