– कृषी वीजपुरवठ्यावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी महावितरणने तातडीने नियोजन करावे; आमदार राजेश बकाने यांची जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत मागणी
वर्धा (प्रकाश कथले) : देवळी–पुलगाव विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतीसाठीचा वीजपुरवठा अपुरा पडत असल्याने शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत आमदार राजेश बकाने यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधत महत्त्वपूर्ण मागणी केली.
बैठकीत बोलताना आमदार बकाने म्हणाले की, सध्या अनेक गावांमध्ये ६३ केव्हीए क्षमतेच्या एका ट्रान्सफॉर्मरवर मोठ्या प्रमाणात कृषी वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरवर क्षमतेपेक्षा अधिक भार येत असून वारंवार वीज खंडित होणे, कमी दाबाने वीज मिळणे, ट्रान्सफॉर्मर जळणे किंवा बिघाड होणे अशा समस्या निर्माण होत आहेत. याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला बसत आहे. यंदा पावसाचे स्वरूप अनिश्चित असून निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक भागांत पिकांना ओलीत करण्याची आवश्यकता भासू शकते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना विद्युत पंपाद्वारे सिंचनावर अवलंबून राहावे लागणार आहे. मात्र, वीजपुरवठा सुरळीत नसल्यास शेतीसमोर मोठे संकट निर्माण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ज्या गावांमध्ये ६३ केव्हीए ट्रान्सफॉर्मरवर क्षमतेपेक्षा अधिक वीज जोडण्या आहेत, त्या ठिकाणी तातडीने १०० केव्हीए क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे नियोजन करावे, अशी मागणी आमदार बकाने यांनी केली. यामुळे ट्रान्सफॉर्मरवरील अतिरिक्त भार कमी होऊन वीजपुरवठा अधिक सुरळीत राहील आणि शेतकऱ्यांना वेळेवर सिंचन करणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि शेतीला आवश्यक असलेला अखंड व दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणने या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही आमदार राजेश बकाने यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने ही मागणी अत्यंत महत्त्वाची असून, तिची अंमलबजावणी झाल्यास आगामी काळात सिंचन व्यवस्थेला मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.