-माता-बाल आरोग्य तपासणी, जनजागृती व प्रतिबंधात्मक आरोग्यसेवांवर भर; ग्रामस्थांनी घेतला सक्रिय सहभाग
चिखली (अंकुश पाटील) : तालुक्यातील भरोसा येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ हे राज्यव्यापी अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. या अभियानांतर्गत माता-बाल संगोपन, मोफत आरोग्य तपासणी आणि आरोग्य जनजागृती शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या विशेष शिबिरामध्ये गावातील शेकडो महिला, गरोदर माता आणि बालकांनी सहभाग नोंदवून विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला. शिबिरात माता व बाल आरोग्याला विशेष प्राधान्य देण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि स्थानिक आरोग्य पथकातील डॉक्टरांनी गरोदर महिलांची प्रसूतीपूर्व आरोग्य तपासणी (ANC) करून सुरक्षित मातृत्व व संस्थात्मक प्रसूतीचे महत्त्व पटवून दिले. गरोदर महिला व किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी करून रक्तक्षय आढळलेल्या महिलांना लोह (आयर्न) व कॅल्शियमच्या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच नवजात बालकांपासून पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचे वजन व उंची मोजून त्यांच्या वाढीचे मूल्यमापन करण्यात आले. कुपोषित व कमी वजनाच्या बालकांच्या पालकांना अतिरिक्त पोषण आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक आरोग्य उपायांवर भर देत आरोग्य दिंडी व विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात आली. जागतिक स्तनपान सप्ताहाचे औचित्य साधून मातांना जन्मानंतरच्या पहिल्या सहा महिन्यांत केवळ स्तनपानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांचे नियमित लसीकरण वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले. पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या आजारांपासून बचावासाठी घर व परिसर स्वच्छ ठेवणे, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणे, पाण्याचे हौद, बॅरल, रांजण आणि सिमेंटच्या टाक्या आठवड्यातून एकदा स्वच्छ धुणे तसेच शुद्ध पाणी वापरण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. या मोहिमेत ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. गावाला आरोग्यसंपन्न बनविण्यासाठी डिजिटल आरोग्य नोंदणी तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेसह विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा संकल्प ग्रामस्थांनी यावेळी केला. या अभियानात डॉ. दिपाली सुरडकर, परिहार मॅडम, श्री. आराख अरविंद, श्रीमती शालिनी लेंडे, श्रीमती पानकोर राजपूत तसेच सर्व आशा स्वयंसेविकांनी मोलाचे योगदान दिले. या मोहिमेमुळे भरोसा गावाने निरोगी, सक्षम आणि आरोग्यसंपन्न गावाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.