-पिकांना पाणी देण्यासाठी स्प्रिंकलरचा वापर; पाणीपातळी घटल्याने शेतकरी दुहेरी संकटात
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : संपूर्ण सिंदखेडराजा तालुक्यात कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असताना खरीपाची पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. ज्यांच्याजवळ ओलिताची सोय आहे, त्यांनी स्प्रिंकलरच्या साहाय्याने पिकांना पाणी देणे सुरू केले आहे. परंतु पाणीपातळी अगोदरच कमी असल्याने हेही किती दिवस चालणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जून महिन्यातच पावसाने हुलकावणी दिली. जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडूनही शेतकऱ्यांनी पेरणी केली. रिमझिम पाऊस बरसत राहिल्याने पिके बहरली. ऑगस्ट महिन्यात सरासरी १८४.०५ मिमी पाऊस अपेक्षित असताना केवळ ४० मिमी पाऊस पडला. तोही काही ठिकाणी झाला, तर काही ठिकाणी जमीन कोरडीच राहिली. पिकांना जीवदान मिळण्यासाठी आवश्यक पावसाची गरज असताना पावसाने पुन्हा हुलकावणी दिली. कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सुकत चाललेल्या पिकांकडे पाहून कपाळाला हात लावण्याची वेळ आली असून, त्यांच्या डोळ्यात पाणी येऊ लागले आहे. सप्टेंबर महिना सुरू होऊन आठवडा उलटला तरी पाऊस झालेला नाही. आभाळ दाटून येते; मात्र पाऊस पडत नाही. आता तर कडक उन्हाळा लागल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन पीक पाकळीत असताना पावसाची नितांत आवश्यकता आहे. ज्यांची शेती ओलिताखाली आहे, त्यांनी स्प्रिंकलरच्या साहाय्याने पिकांना पाणी देणे सुरू केले आहे. मात्र कोरडवाहू शेतीची अवस्था बिकट झाली असून, पिके करपू लागली आहेत आणि पाकळ्या गळून पडत आहेत. तालुक्यात केवळ ५५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला असून, तलाव, विहिरी आणि मोठ्या प्रकल्पांची पाणीपातळीही ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. कपाशी व तूर या पिकांची अवस्थाही बिकट झाली आहे. त्यामुळे सिंदखेडराजा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी सातत्याने होत आहे.
स्प्रिंकलरच्या तोट्या, सोलर केबलची चोरी; शेतकरी दहशतीत
शेतकरी शेतात पाणी देण्यासाठी स्प्रिंकलरचा वापर करीत असताना चोरट्यांनी स्प्रिंकलरच्या तोट्या काढून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. तर काही ठिकाणी सौरऊर्जेवरील केबल वायर चोरीच्या घटनाही घडल्या आहेत. सततच्या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजपर्यंत एकाही चोरीच्या घटनेचा तपास लागला नसल्याचे सांगण्यात येत आहे. अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. रात्री बिनधास्तपणे चोरटे घरफोड्या करीत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हातात लोखंडी रॉड घेऊन चोरटे फिरताना दिसत असल्याने गावातील नागरिकांना आता गस्त घालण्याची गरज निर्माण झाली आहे.