-तलवारबाजीच्या मैदानातून आत्मविश्वास, शिस्त आणि विजयाची नवी वाटचाल
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, बुलढाणा व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच बुलढाणा जिल्हा तलवारबाजी असोसिएशनच्या सहकार्याने जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेचे आज, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन करण्यात आले.
खेळ म्हणजे केवळ पदक मिळविण्याचे माध्यम नसून व्यक्तिमत्त्व घडविणारी शाळा आहे. खेळामुळे शिस्त, आत्मविश्वास, संयम, निर्णयक्षमता, नेतृत्वगुण आणि संघर्ष करण्याची जिद्द निर्माण होते. तलवारबाजीसारख्या खेळातून वेग, चपळता, एकाग्रता आणि प्रसंगावधान या गुणांचा उत्कृष्ट विकास होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही सातत्याने प्रगती करण्यासाठी प्रयत्न करावेत, असा संदेश या स्पर्धेतून देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला महाविद्यालय, बुलढाणाचे प्राचार्य डॉ. सुरेश बाठे होते. स्पर्धेचे उद्घाटन श्री शरद शिक्षण व युवक कल्याण संस्था, चिखली, जि. बुलढाणा यांच्या संचालिका तथा प्राध्यापिका प्रा. डॉ. सौ. प्रेरणाताई गुजर (पाटील) यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून कला महाविद्यालयाचे फिजिकल डायरेक्टर तथा बुलढाणा जिल्हा आर्चरी असोसिएशनचे सचिव श्री. मनोज व्यवहारे, बुलढाणा जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे सचिव श्री. शेषनारायणजी लोढे तसेच राज्य क्रीडा मार्गदर्शिका सौ. उज्वला लांडगे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन तसेच तलवारबाजीच्या साहित्याचे पूजन करून करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना श्री. मनोज व्यवहारे यांनी खेळाडूंनी केवळ मेडल मिळविण्यापुरते मर्यादित न राहता क्रीडा क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहावे, असे आवाहन केले. आजच्या काळात क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांसाठी विविध संधी उपलब्ध असून, सातत्यपूर्ण मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि जिद्दीच्या जोरावर खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करू शकतात, असे त्यांनी सांगितले. प्रा. डॉ. सौ. प्रेरणाताई गुजर (पाटील) यांनी मार्गदर्शन करताना, “स्पर्धेत यश मिळवायचे असेल तर नियमित सराव, शिस्त आणि सातत्य अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे सांगितले. खेळाडूंनी पराभवातून शिकून पुढील विजयासाठी प्रयत्नशील राहावे, असा संदेशही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी स्पर्धेचे रीतसर उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने नेहमी सहकार्य करणारे श्री. शेषनारायण लोढे यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.
१४ वर्षे वयोगटातील तलवारबाजी स्पर्धेचे निकाल
ईपी (Epee) — मुली :
कु. तनुजा जाधव — सुवर्णपदक
कु. शर्वरी मिसाळ — रौप्यपदक
कु. नवीका शेळके — कांस्यपदक
कु. खुशी वाघमारे — कांस्यपदक
ईपी (Epee) — मुले :
आर्यन थोरात — सुवर्णपदक
अथर्व जेऊघाले — रौप्यपदक
सतेज अंभोरे — कांस्यपदक
मानस लामखेडे — कांस्यपदक
फॉईल (Foil) — मुली :
कु. वैष्णवी वाघमारे — सुवर्णपदक
कु. श्रावणी सावळे — रौप्यपदक
कु. अभिज्ञा यंगड — कांस्यपदक
कु. वेदिता दवड — कांस्यपदक
फॉईल (Foil) — मुले :
अथर्व जेऊघाले — सुवर्णपदक
विराट जाधव — रौप्यपदक
मृदुल रोठे — कांस्यपदक
कार्तिक सराफ — कांस्यपदक
सेबर (Saber) — मुले :
विराट जाधव — सुवर्णपदक
मानस लामखेडे — रौप्यपदक
शिवाश राजपूत — कांस्यपदक
वीर खरे — कांस्यपदक
सेबर (Saber) — मुली :
कु. सानिध्या देशमुख — सुवर्णपदक
कु. सिद्धी कांबळे — रौप्यपदक
कु. स्वरा जगताप — कांस्यपदक
कु. धनश्री बंगाळे — कांस्यपदक
“मैदानावरची प्रत्येक लढत खेळाडूला अधिक सक्षम बनवते; विजय पदकाने मिळतो, पण खरा विजय आत्मविश्वास आणि जिद्दीने मिळतो,” या भावनेने स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी उत्कृष्ट क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सहसचिव तथा क्रीडाशिक्षक श्री. नितीन जेऊघाले यांनी आपल्या बहारदार शैलीत केले, तर आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव श्री. शेषनारायण लोढे यांनी केले. स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू, प्रशिक्षक व पालकांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.