-रात्रीच्या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांत दहशतीचे वातावरण; पोलिसांनी चोरट्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : गोरेगाव शिवारातील सात शेतकऱ्यांच्या शेतात बसविण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रकल्पांवरील केबल वायर चोरीच्या घटना घडल्या असून, दररोज होणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरीच्या घटनांचा पोलिसांनी तत्काळ तपास करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गेल्या १५ दिवसांपासून साखरखेर्डा, राताळी, मोहाडी, सवडद, गुंज, गुंजमाथा, सावंगी भगत आणि गोरेगाव परिसरातील शेतांमध्ये बसविण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रकल्पांच्या वीज जोडणीवरील तांब्याची तार असलेली केबल चोरट्यांनी लंपास केली आहे. गेल्या चार-पाच दिवसांत गोरेगाव शिवारातील अभिमन्यू इंगळे, गिरीश पांचाळ, प्रवीण सखाराम गवई, जयदीप महाजन, सखाराम गिनाजी गवई, संगिता रमेश कव्हळे आणि विनायक पांचाळ यांच्या शेतातील केबल वायर चोरट्यांनी तोडून नेली आहे. यामुळे सौरऊर्जा प्रकल्पांचेही नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी हा प्रकार घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार होणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, सौरऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे साखरखेर्डा पोलिसांनी या चोरीच्या घटनांचा तत्काळ तपास करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.