-गरजू व वयोवृद्ध कलावंतांना शासनाचा मानधन लाभ मिळवून देण्याची महत्त्वाची जबाबदारी
अंकुश पाटील (चिखली) : राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या पावन सिंदखेडराजा भूमीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना’ अंतर्गत बुलढाणा जिल्हास्तरीय निवड समितीवर सिंदखेडराजा तालुक्यातील शेदुर्जन येथील ज्येष्ठ कीर्तनकार व महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. श्री दामू अण्णा महाराज शिंगणे यांची अशासकीय सदस्य म्हणून महत्त्वपूर्ण शासकीय नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या विशेष शिफारसीवरून आणि बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत आदेशान्वये ही निवड जाहीर करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत या समितीची घोषणा करण्यात आली असून, जिल्हाधिकारी हे या विशेष समितीचे अध्यक्ष आहेत.
ह.भ.प. श्री दामू अण्णा महाराज शिंगणे हे गेल्या अनेक वर्षांपासून कीर्तन आणि प्रबोधनाच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अविरत कार्यरत आहेत. या समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील, विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील दुर्लक्षित, गरजू आणि वयोवृद्ध कलावंतांचा शोध घेऊन त्यांना शासनाचा मानधन लाभ मिळवून देण्याचे अत्यंत महत्त्वाचे दायित्व आता त्यांच्यावर असणार आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे खऱ्या अर्थाने गरजू कलावंतांना न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दामू अण्णा शिंगणे यांच्या या निवडीचे वृत्त समजताच सिंदखेडराजा तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. शेदुर्जन ग्रामस्थांसह राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.