– बुलढाण्यात पावसाने घेतला बळी; पोटापाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या आई-वडिलांवर आभाळ फाटले; तातडीच्या शासकीय मदतीची नितांत आवश्यकता!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) : शहरातील खामगाव मार्गावरील नागसेन नगर परिसरात अंगावर भिंत पडून एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. दीक्षा कृष्णा चव्हाण असे या मृत मुलीचे नाव असून, ती अवघ्या दुसऱ्या इयत्तेत शिकत होती. गरिबीशी संघर्ष करणाऱ्या एका कष्टकरी कुटुंबावर या घटनेमुळे मोठा आघात झाला असून, परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
दीक्षा ही बुलढाण्यातील गांधी प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी होती. ती तिचे वडील कृष्णा वसंता चव्हाण आणि आई रेखा यांच्यासोबत नागसेन नगरमधील नालंदा वाचनालयाजवळ राहायची. प्राप्त माहितीनुसार, चव्हाण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. दीक्षाची आई रेखा या परिसरातील घरांमध्ये धुणीभांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. एकीकडे पोटापाण्यासाठी सुरू असलेला रोजचा संघर्ष आणि त्यातच आपल्या चिमुकलीचा असा अपघाती मृत्यू, यामुळे हे कुटुंब पूर्णपणे कोलमडून गेले आहे.
जिल्हा प्रशासनाने संवेदनशीलतेने दखल घेण्याची गरज!
चव्हाण कुटुंब अतिशय गरिबीत जीवन जगत असून, या अनपेक्षित संकटामुळे त्यांना सावरणे कठीण झाले आहे. या कठीण प्रसंगात त्यांना आधाराची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि महसूल विभागाने अत्यंत संवेदनशीलतेने या प्रकरणाची दखल घेणे गरजेचे आहे. प्रशासनाने तातडीने घटनास्थळाचा पंचनामा करून या कुटुंबाला त्वरित आणि भरीव शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आता स्थानिक नागरिक आणि सामाजिक स्तरातून जिल्हाधिकाऱ्यांकडे केली जात आहे.