-तीन आठवड्यांच्या खंडानंतर पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांत समाधान, मात्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप गंभीर
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : तब्बल तीन आठवड्यांच्या मोठ्या खंडानंतर साखरखेर्डा परिसरात सर्वदूर रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असले, तरी परिसरातील पाणीटंचाईचे संकट अद्याप कायम आहे.
या पावसाचा मूग, उडीद, सोयाबीन, तूर, कापूस, तीळ, मका आदी खरीप पिकांना मोठा लाभ झाला आहे. त्यामुळे अल-निनोचा संभाव्य धोका सध्या तरी टळल्याची चर्चा शेतकरी वर्गात सुरू आहे. यंदा मान्सूनचे उशिरा आगमन झाल्यामुळे खरीप पेरण्या उशिरा झाल्या. त्यानंतर काही भागात कमी तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. पिके उगवल्यानंतर शेतकऱ्यांनी खतांच्या मात्रा दिल्या, तणनाशकांची फवारणी केली तसेच निंदणी, खुरपणी आणि कोळपणीची कामे पूर्ण केली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडले होते.
पेरणीनंतर झालेल्या दीर्घ उघडीप आणि कडक उन्हामुळे कोवळी पिके करपण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकरी आकाशाकडे डोळे लावून पावसाची प्रतीक्षा करत होते. या कालावधीत शेतकऱ्यांनी उघडीपचा फायदा घेत निंदणी, खुरपणी, कोळपणी, कापूस पिकातील वखरणी तसेच तणनाशक व कीडनाशक फवारण्या करून पिके तणमुक्त व कीडमुक्त ठेवण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आता शेतातील पिके बहरली असून संपूर्ण परिसर हिरवाईने नटला आहे. शेतशिवारात जणू हिरवागार गालिचा अंथरल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून ते पुन्हा शेतीच्या पुढील कामांमध्ये व्यस्त झाले आहेत. मात्र, शेतीला दिलासा मिळाला असला तरी पिण्याच्या पाण्याची टंचाई अद्यापही कायम असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.