-‘आदर्श नेतृत्व’ विषयावर विद्यार्थ्यांची प्रभावी भाषणे; शालेय साहित्य व रोख पारितोषिकांचे वितरण
चिखली (राजेंद्र घुबे) : महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या हरितक्रांतीचे जनक व माजी मंत्री स्व. भारतभाऊ बोंद्रे यांच्या जयंतीनिमित्त देऊळगाव घुबे येथील जानकीदेवी विद्यालयात “आदर्श नेतृत्व” या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. अजितदादा पवार आणि स्व. भारतभाऊ बोंद्रे यांच्या प्रतिमांचे पूजन करून मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संतोष परिहार यांनी प्रास्ताविकातून वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. स्पर्धेत सुमारे १५ ते २० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यामध्ये इयत्ता १२ वीची विद्यार्थिनी कु. साक्षी दादाराव घुबे हिने प्रथम, कु. भक्ती शांताराम जावळे हिने द्वितीय, तर कु. अंजली रामेश्वर झाल्टे हिने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचेही वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेनफडराव घुबे होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे, चिखली तालुकाध्यक्ष संतोष परिहार, संस्थेचे सचिव प्रा. उद्धवराव घुबे, तालुका कार्याध्यक्ष विलास वसू, युवा नेते अर्जुन बोंद्रे, माजी सरपंच प्रकाश (आबा) घुबे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष दिनकराव घुबे, विद्यालयाचे प्राचार्य बबनराव लांडगे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रा. उद्धवराव घुबे यांनी प्रास्ताविकातून स्व. अजितदादा पवार आणि स्व. भारतभाऊ बोंद्रे यांच्या कार्याचा गौरव केला. प्रमुख पाहुणे शंतनू बोंद्रे यांनी दोन्ही दिवंगत नेत्यांच्या राजकीय व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकत वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात शेनफडराव घुबे यांनी स्व. भारतभाऊ बोंद्रे आणि स्व. अजितदादा पवार यांच्या संस्थेच्या विकासातील योगदानाची आठवण करून देताना भावनिक होत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या कार्यामुळेच आज संस्था विविध उपक्रम यशस्वीपणे राबवू शकत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शंतनू बोंद्रे यांच्यासह सर्व आयोजकांचेही त्यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य बबनराव लांडगे यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संजय सावंत यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. उद्धवराव घुबे यांनी मानले.