-लोकजागर परिवाराचे प्रवीण गीते, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे सहदेव लाड यांच्यासह ग्रामस्थांचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन; मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा
बिबी (ऋषी दंदाले) : सिंदखेडराजा तालुक्यातील देवखेड येथील ५० हून अधिक शाळकरी मुलींना रुम्हणा येथील शाळेत सुरक्षितपणे ये-जा करता यावी, यासाठी तात्काळ शालेय बस उपलब्ध करून देण्याची मागणी लोकजागर परिवाराचे विश्वस्त प्रवीण गीते, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड तसेच ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी, सिंदखेडराजा यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, देवखेड ते रुम्हणा हे अंतर सुमारे साडेतीन किलोमीटर असून देवखेड गावात प्रामुख्याने शेतकरी व शेतमजूर कुटुंबे वास्तव्यास आहेत. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे विद्यार्थिनींच्या दैनंदिन प्रवासासाठी खासगी वाहनांचा खर्च पालकांना परवडत नाही. परिणामी, अनेक शाळकरी मुलींना दररोज पायी शाळेत जावे लागत असून त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
विद्यार्थिनींचे शिक्षण अखंडित राहावे तसेच त्यांना सुरक्षित आणि नियमित वाहतुकीची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शिक्षण विभागाने तातडीने शालेय बसची व्यवस्था करावी, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. प्रशासनाने या मागणीकडे तात्काळ सकारात्मक दखल न घेतल्यास लोकजागर परिवार, क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि ग्रामस्थांच्या वतीने तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर प्रवीण गीते, सहदेव लाड, संदीप भोसले, प्रकाश खरात, अधिकार खरात, संजय खरात, पंजाब खरात, सतीश खरात, पंकज खरात, अंकुश काकडे, कुंदन खरात, लखन खंडागळे यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.