-भाजपच्या प्रभावशाली कुटुंबातील सदस्याने बदलली राजकीय वाट; तालुक्यात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : शेवगाव तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घडामोड घडली असून, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जगदंबा भक्त दिनेश आबा लव्हाट यांचे ज्येष्ठ पुत्र, आमदार ॲड. अक्षय कर्डिले यांचे साडू तसेच इनोव्हेटिव्ह डिझायनर्स अँड इंजिनियर्स असोसिएशनचे अध्यक्ष इंजि. अजिंक्य डी. लव्हाट यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे शेवगाव तालुक्यात नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
सामान्यतः विरोधी पक्षातील कार्यकर्ते सत्ताधारी पक्षात प्रवेश करताना दिसतात. मात्र, यावेळी भाजपच्या प्रभावशाली कुटुंबातील सदस्याने ठाकरे शिवसेनेची वाट धरल्याने हा पक्षप्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. पक्षप्रवेशानंतर इंजि. अजिंक्य लव्हाट यांनी आपल्या भूमिकेबाबत स्पष्ट करताना सांगितले, “शेवगाव तालुक्यात सामान्य जनतेवर होत असलेल्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. मला कोणत्याही पदाचा मोह नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जी जबाबदारी देतील, ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन.”
कौटुंबिक भूमिकेबाबत बोलताना त्यांनी सांगितले, “माझ्या निर्णयाला वडिलांचा आशीर्वाद आहे. मात्र ते भाजपमध्येच कार्यरत असून, त्यांच्या राजकीय भूमिकेचा आणि माझ्या निर्णयाचा कोणताही संबंध नाही.” नगर येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी तालुकाप्रमुख ॲड. अविनाश मगरे, उदय गांगुर्डे, शिवाजी मडके, कानिफ कर्डिले यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या पक्षप्रवेशानंतर शेवगाव तालुक्यात विविध राजकीय चर्चांना उधाण आले असून, हा केवळ एका व्यक्तीचा पक्षप्रवेश आहे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदलत्या राजकीय समीकरणांची नांदी, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.