-साहित्य, सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव; पुणे विभागातील साहित्य चळवळीला मिळणार नवी दिशा
आळंदी (अर्जुन मेदनकर) : रावेत (पुणे) येथील राज्यशास्त्राचे सेवानिवृत्त प्राध्यापक, संत साहित्याचे अभ्यासक, अध्यात्मिक ग्रंथांचे लेखक, महाराष्ट्रातील संतपरंपरेवर विपुल लेखन करणारे अभंग चरित्रकार, कथाकार, कादंबरीकार, कवी तसेच अनेक पुरस्कारांनी सन्मानित साहित्यिक विद्यावाचस्पती प्रा. डॉ. रामकृष्णा महाराज पाटील यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पुणे विभागीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगीताई काळभोर यांच्या स्वाक्षरीने त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२८ पर्यंत राहणार आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत परिषदेने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन, संतवाङ्मयाचा प्रसार, अध्यात्मिक मूल्यांची जोपासना तसेच नवोदित साहित्यिकांना प्रेरणा देण्याचे त्यांचे कार्य राज्यभर गौरविले गेले आहे. प्रा. डॉ. रामकृष्णा महाराज पाटील हे सुमारे दीडशेहून अधिक ग्रंथांचे लेखक असून संत साहित्य, अध्यात्म, चरित्र, कथा, कादंबरी, कविता आणि वैचारिक लेखन अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. महाराष्ट्रातील संतांच्या जीवनकार्याचा सखोल अभ्यास करून त्यांनी अभंग चरित्रलेखनाच्या माध्यमातून मराठी साहित्यविश्वात स्वतंत्र आणि मानाचे स्थान निर्माण केले आहे.
या नियुक्तीमुळे पुणे विभागातील साहित्य परिषदेच्या कार्याला नवी गती मिळेल, साहित्यिक चळवळी अधिक व्यापक स्वरूपात समाजापर्यंत पोहोचतील तसेच सुसंस्कारित, समताधिष्ठित आणि वैचारिक समाजनिर्मितीसाठी साहित्याचा प्रभावी वापर होईल, असा विश्वास साहित्यप्रेमी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केला आहे. प्रा. डॉ. रामकृष्णा महाराज पाटील यांच्या निवडीबद्दल साहित्य, सामाजिक, शैक्षणिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आळंदी जनहित फाउंडेशनच्या वतीने कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर आणि अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.