-चिखली तहसील कार्यालयाला भेट; ९३.७६ टक्के ईएफ फॉर्म वाटप पूर्ण, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओचा सन्मान
चिखली (राजेंद्र घुबे/अंकुश पाटील) : बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांनी सोमवार, दि. १३ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता चिखली तहसील कार्यालयाला भेट देऊन २३-चिखली विधानसभा मतदारसंघातील विशेष सखोल पुनरिक्षण (SIR-2026) मोहिमेचा आढावा घेतला. यावेळी मतदार पडताळणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या क्षेत्रीय अधिकारी व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली.
दि. १२ जुलै २०२६ अखेरच्या अहवालानुसार, २३-चिखली विधानसभा मतदारसंघातील एकूण ३ लाख १ हजार ७२० मतदारांपैकी २ लाख ८२ हजार ८८५ गणनापत्रांचे (ईएफ फॉर्म) वाटप पूर्ण झाले असून त्याचे प्रमाण ९३.७६ टक्के आहे. तसेच ७१ हजार ७६ गणनापत्रांचे ऑनलाइन डिजिटलायझेशन पूर्ण झाले असून त्याचे प्रमाण २३.५६ टक्के आहे.
ज्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (BLO) कामाची गती कमी आहे, त्यांच्याकडे विशेष लक्ष देऊन भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या कालावधीत उर्वरित कामकाज पूर्ण करण्याच्या सूचना उपस्थित सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी ज्या मतदार यादी भागामध्ये एसआयआरचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे, त्या यादी भाग क्रमांक २७७, पळसखेड दौलत येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) योगेश काशिनाथ पाटील, पर्यवेक्षक संजय चौधरी तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी राजेश वाघ यांचा जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. या सन्मानामुळे उर्वरित अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही एसआयआरचे काम अधिक वेगाने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.