-चौथ्या दिवशी शोधमोहीमेला यश; मृतांची संख्या आठवर, एनडीआरएफकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
पुणे (अर्जुन मेदनकर) : मोशी कचरा डेपो येथे झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या शोधमोहीमेच्या चौथ्या दिवशी इमारतीत अडकलेल्या सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर एका व्यक्तीचा अद्यापही शोध सुरू असून, या दुर्घटनेतील मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास कचऱ्याचा प्रचंड ढिगारा ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळून ही गंभीर दुर्घटना घडली. त्यावेळी इमारतीत २२ आणि इमारतीशेजारील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली एक असे एकूण २३ जण अडकले होते. यापैकी पाच जण सुखरूप बाहेर पडले. उर्वरितांना बाहेर काढण्यासाठी भारतीय सेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले. त्याच दिवशी नऊ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली होती. यानंतर ९ जुलै रोजी भावेश वाणी यांना इमारतीतून बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त इमारतीत प्रवेश करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. मात्र इमारत अत्यंत धोकादायक आणि अस्थिर झाल्याने सुरक्षित मार्ग तयार करण्यात अनेक अडचणी आल्या. त्यामुळे १२ पोकलेन, जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने इमारतीभोवतीचा मलबा हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. शुक्रवारी रात्री इमारतीचा धोकादायक काँक्रीटचा भाग हटविण्यासाठी दोन अत्याधुनिक डिमोलिशन एक्स्कॅव्हेटर मशिन घटनास्थळी आणण्यात आल्या. एनडीआरएफच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली अस्थिर भाग नियंत्रित पद्धतीने हटविल्यानंतर बचाव पथकाला इमारतीत प्रवेश करता आला.
शनिवारी दिवसभर सुरू असलेल्या शोधमोहीमेदरम्यान अक्षय सावंत (वय ३५, मोशी), सुनील कोरके (वय ४०, आळंदी), सन्नी माने (वय ३९, गंधर्वनगरी, मोशी), महेश कुंभार (वय ३३, छत्रपती संभाजीनगर), नागेश गायकवाड (वय २६, संजय गांधी नगर, मोशी), रणजीत पाटील (वय २२, मोशी) आणि राहुल गायकवाड (वय ३५, मोशी) हे सात जण इमारतीत मृतावस्थेत आढळून आले. सर्वांना तातडीने पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी तपासणीनंतर सर्वांना मृत घोषित केले. दरम्यान, इमारतीशेजारील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आणखी एका व्यक्तीचा शोध अद्याप सुरू असून, त्यासाठी एनडीआरएफच्या श्वान पथकासह अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येत आहे. संबंधित व्यक्तीचा शोध लागेपर्यंत बचाव व शोधमोहीम अविरत सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.