-महापूजा, आरती, हरिनाम गजराने परिसर भक्तिमय; भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी
आळंदी (अर्जुन मेदनकर) : पुणे-आळंदी मार्गावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात आषाढी पायी वारीनिमित्त माऊलींच्या पालखी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्याचे मालक ऋषिकेश आरफळकर तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने परंपरेनुसार हरिनामाच्या गजरात श्रींच्या वैभवी चलपादुका मंदिरात आणण्यात आल्या.
यावेळी माऊलींच्या पादुकांची दही, दूध व मधाने महापूजा करण्यात आली. त्यानंतर आरती, पुरणपोळीचा महानैवेद्य आणि पेढ्यांचा प्रसाद अर्पण करण्यात आला. श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर व सुनीता तापकीर यांच्या हस्ते श्रींची विधिवत पूजा करण्यात आली. या सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. आषाढी पायी वारीदरम्यान पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या माऊलींच्या वैभवी चलपादुकांनी थोरल्या पादुका मंदिरात विसावा घेतला. परंपरेनुसार पादुकांची महापूजा करण्यात आली. यावेळी हार, तुळशीहार व श्रीफळ अर्पण करण्यात आले. त्यानंतर हरिनामाच्या गजरात माऊलींची आरती करण्यात आली. मंदिर परिसरात आकर्षक रांगोळ्या आणि फुलांच्या पायघड्यांमुळे भक्तिमय वातावरण अधिकच खुलून दिसत होते.
यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे (कबीरबुवा), विश्वस्त ॲड. रोहिणी पवार, पुरुषोत्तम महाराज पाटील, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब रणदिवे चोपदार, माजी सभापती अरुण चौधरी आदी मान्यवरांचा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांच्या हस्ते शाल, उपरणे व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी रवींद्र गायकवाड, शांताराम तापकीर, राजेंद्र नाणेकर, चंद्रकांत मोरे, साहेबराव काशीद, मंदिराचे पुजारी विठ्ठल पांचाळ तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. सोहळ्यानिमित्त पोलीस उपायुक्त (डीसीपी) मारुती जगताप आणि दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिर परिसरातील आकर्षक रांगोळी रोहिणी परतगुळे यांनी साकारली होती.