-डोंगरशेवली शिवारातील जंगलात सुरू असलेला हातभट्टीचा व्यवसाय उद्ध्वस्त; दोन महिलांविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल
अमडापूर : अमडापूर पोलीस स्टेशनच्या पथकाने डोंगरशेवली शिवारातील दरी-खोऱ्यातील जंगल परिसरात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर गुरुवारी (दि. ९) धडक कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे ठाणेदार जयसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी दारू, सडावा व साहित्य नष्ट केले.
या कारवाईत रेखाबाई सुनील पवार व मंगलाबाई गणेश पवार (दोघी रा. डोंगरखंडाळा, ता. चिखली) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. रेखाबाई पवार यांच्या ताब्यातून १४ लिटर हातभट्टी दारू (अंदाजे किंमत ६०० रुपये) तसेच इतर मुद्देमालासह एकूण ३,४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर मंगलाबाई पवार यांच्या ताब्यातून १४ लिटर हातभट्टी दारू (अंदाजे किंमत ७०० रुपये) व इतर मुद्देमालासह एकूण ३,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाईदरम्यान हातभट्टी दारू व सडावा जागेवरच नष्ट करण्यात आला. सदर कारवाई ठाणेदार जयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (एएसआय) निवृत्ती चेके, पोलीस हवालदार बिलगे, पोलीस शिपाई चंद्रशेखर मुरडकर, दुर्गासिंग ठाकूर, रंजीत सरोदे, चालक चिंचोले तसेच महिला अंमलदार वैशाली आराख यांनी संयुक्तपणे पार पाडली. दोन्ही महिला आरोपींविरुद्ध अमडापूर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास बीट अंमलदार एएसआय निवृत्ती चेके करीत आहेत.