-श्री सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते उद्घाटन; ग्रामीण कलाकारांच्या कलागुणांना मिळाला नवा मंच
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा आणि देऊळगाव माळी येथील कलाकारांनी ग्रामीण जीवनावर आधारित ‘डाल्या अन् अंगार’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली असून, या चित्रपटाचे प्रदर्शन श्री पलसिद्ध महास्वामी मठात मठाधिपती श्री सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
ग्रामीण भागातील कलाकारांना चित्रपटसृष्टीत संधी मिळावी आणि त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने सहकार विद्या मंदिराचे सहाय्यक शिक्षक सुनील गायकवाड यांनी या चित्रपटाच्या निर्मितीचा निर्णय घेतला. यापूर्वी त्यांनी अनेक चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. स्वतः कलाकार असल्याने ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना संधी देण्याची जिद्द त्यांनी जोपासली. साखरखेर्डा येथील माहेर असलेल्या सौ. उज्वला काळे यांच्यापर्यंत हा उपक्रम पोहोचविण्यात आला. बालवयापासूनच गायन, वक्तृत्व आणि विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळविलेल्या उज्वला काळे यांनी मराठवाडा, महाराष्ट्र तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सौंदर्य स्पर्धांमध्येही सहभाग नोंदविला आहे. कलेची आवड आणि अभिनयाची ओढ लक्षात घेऊन त्यांनी या चित्रपटात भूमिका साकारली. तसेच चित्रपट निर्मितीसाठी आर्थिक पाठबळही दिल्यामुळे हा चित्रपट साकार होण्यास मोठी मदत झाली.
चित्रपटाच्या प्रदर्शनप्रसंगी मठाधिपती श्री सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांनी कलाकारांचे कौतुक करत ग्रामीण भागातील कलावंतांनी अशा माध्यमातून आपली कला जपावी आणि समाजापुढे सकारात्मक संदेश ठेवावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमास सरपंच सौ. ज्योती अमित जाधव, माजी उपसभापती सुनील जगताप, माजी सरपंच चंद्रशेखर शुक्ल, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमेश ठोसरे, तेजराव ठोसरे, डॉ. प्रशांत भालेराव यांच्यासह ग्रामस्थ आणि कलारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय राजगुरू यांनी केले.