चिखली तालुक्यात आंदोलनाचा जोर वाढला; विनायक सरनाईक यांचा आंदोलनाला जाहीर पाठिंबा!
बुलढाणा (बाळू वानखेडे) : कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर्स यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी जिल्हाभरात आंदोलनाचा भडका उडाला आहे. चिखली तालुक्यातील शेलगाव जहागीर, पाटोदा, एकलारा, दिवठाणा, भोरसा-भोरसी आणि बोरगाव काकडे यांसह विविध ग्रामपंचायतींसमोर १ जुलै २०२६ पासून सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. एकीकडे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना, दुसरीकडे हक्काच्या भत्त्यासाठी महिला भरपावसात रस्त्यावर बसल्या आहेत. मात्र, प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
विनायक सरनाईक यांचा आंदोलनाला जाहीर पाठिंबा
क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन महिलांशी चर्चा केली व त्यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला. याप्रसंगी बोलताना त्यांनी प्रशासकीय दिरंगाईवर तीव्र प्रहार केला:
“गेल्या तीन दिवसांपासून महिला आपल्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलनाला बसल्या आहेत. बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी रखडलेला कोरोना भत्ता टप्प्याटप्प्याने देण्याचे आदेश दिलेले असतानाही, स्थानिक स्तरावर प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. चिखली तालुक्यातील महिला आंदोलकांच्या मागण्या तातडीने मान्य करा, अन्यथा क्रांतीकारी शेतकरी संघटना या माता-भगिनींसाठी रस्त्यावर उतरेल,” असा थेट इशारा सरनाईक यांनी दिला.
आंदोलनस्थळावरूनच अधिकाऱ्यांना फोन
आंदोलनाचे गांभीर्य ओळखून विनायक सरनाईक यांनी थेट आंदोलनस्थळावरूनच जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भारसाखळे, तहसीलदार गायकवाड आणि चिखलीचे गटविकास अधिकारी (BDO) यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. त्यांनी अधिकाऱ्यांना या संवेदनशील विषयावर तात्काळ तोडगा काढण्याची विनंती केली. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी “मागण्यांच्या अनुषंगाने लवकरच सकारात्मक तोडगा काढू,” असे तोंडी आश्वासन दिले आहे.
‘सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन’ (सीटू) संलग्न आशा व गटप्रवर्तक संघटना तसेच अंगणवाडी कर्मचारी संघटनेने २ जुलै २०२६ रोजी मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांना थेट पत्र पाठवले आहे. या पत्रातून प्रशासनाचा अत्यंत धक्कादायक कारभार समोर आला आहे:
- ५ वर्षांची टाळाटाळ: गेल्या पाच वर्षांपासून अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्सचा तब्बल २३ महिन्यांचा कोरोना प्रोत्साहन भत्ता थकीत आहे.
- वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली: वरिष्ठ पातळीवरून (जा.क्र/बुजिप/साप्रवि/ग्रामपं/अनुदान-१२५/२०२६ दिनांक १०/०४/२०२६) निधी व भत्त्या संदर्भात स्पष्ट आदेश आलेले असतानाही, स्थानिक गटविकास अधिकारी (BDO) हे ‘आदेश प्राप्त नसणे’ किंवा ‘निधी उपलब्ध नसणे’ अशी कारणे पुढे करून टाळाटाळ करत आहेत.
- निधी हडपल्याचा संशय: वरिष्ठांचे आदेश असूनही हक्काचा मोबदला दिला जात नसल्याने ही अत्यंत मोठी शोकांतिका असून, अंगणवाडी सेविकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
१० जुलै रोजी ‘सीटू’चा एल्गार!
प्रशासनाने केवळ आश्वासनांचे गाजर न दाखवता थेट बँक खात्यात रक्कम जमा करावी, अशी भूमिका महिलांनी घेतली आहे. प्रशासकीय पातळीवर तातडीने हालचाली न झाल्यास, १० जुलै २०२६ रोजी ‘सीटू’ (CITU) संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड, जिल्हा सचिव प्रतिभा पाटील आणि ललिता बोदडे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती चिखली येथील गटविकास अधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येणार आहे, असा इशारा संघटनेने दिला आहे.
प्रमुख मागण्या: १. कोरोना काळातील थकीत २३ महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता तात्काळ मिळावा. २. अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे थकीत मानधन विनाविलंब अदा करावे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत एकही महिला मागे हटणार नाही, असा ठाम निर्धार चिखली तालुक्यातील आंदोलनकर्त्यांनी केला आहे. आता जिल्हा प्रशासन यावर काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.