-रुग्णसेवेसाठी समर्पित कार्याचा गौरव; सहकाऱ्यांकडून केक कापून व्यक्त केली कृतज्ञता
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त किनगाव राजा येथील श्री माऊली हॉस्पिटलमध्ये सेवाभावी कार्याला सलाम करत उत्साहपूर्ण वातावरणात डॉक्टर दिन साजरा करण्यात आला. यावेळी हॉस्पिटलचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर नागरे आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कल्पना ज्ञानेश्वर नागरे यांचा सहकाऱ्यांच्या हस्ते केक कापून सत्कार करण्यात आला.
यावेळी अक्षय उबाळे, गजानन किंगरे, ऋषी नागरे, ऋषी जायभाये, देवानंद काळुसे, साक्षी मस्के आणि पल्लवी राऊत यांनी दोन्ही डॉक्टरांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. त्यांच्या रुग्णसेवेतील अविरत योगदानाबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी उपस्थितांनी मनोगत व्यक्त करत, “रुग्णांची अहोरात्र सेवा करून त्यांना नवजीवन देणारे डॉक्टर हे समाजातील खरे सेवाव्रती आहेत. त्यांचे समर्पण, सेवाभाव आणि कर्तव्यनिष्ठा ही समाजासाठी प्रेरणादायी आहे,” अशा भावना व्यक्त केल्या.
सत्काराला उत्तर देताना डॉ. ज्ञानेश्वर नागरे आणि डॉ. कल्पना नागरे यांनी रुग्णसेवा हीच आपली सर्वोच्च जबाबदारी असल्याचे सांगितले. भविष्यातही अधिक संवेदनशीलता, समर्पण आणि सेवाभावाने रुग्णांची सेवा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त उपस्थितांनी सर्व डॉक्टर बंधू-भगिनींना शुभेच्छा देत, समाजाचे आरोग्य जपण्यासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील सर्व सेवाव्रतींप्रती कृतज्ञता व्यक्त केली.