-तीन आरोपी अटकेत; तीन चोरीचे गुन्हे उघड, चार लाखांचा मुद्देमाल जप्त
मलकापूर (सुरेश हुसे) : मलकापूर शहर पोलिसांनी चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत मोठे यश मिळवत कृषी साहित्य व महावितरण कंपनीच्या केबल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या टोळीने केलेले तीन चोरीचे गुन्हेही उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दि. २७ जून २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाकडे सोपविण्यात आला. तपासादरम्यान तक्रारदाराच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता दोन अज्ञात व्यक्ती चोरीचे साहित्य घेऊन जात असल्याचे आढळून आले. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींचा शोध घेतला. या कारवाईत शेख साबीर शेख अहमद (वय ३२), जावेद खान मुसा खान (वय ३८), दोघे रा. सायकलपुरा, मलकापूर आणि मो. सोहेल मो. रफीक (वय २९, रा. पंतनगर, मलकापूर) यांना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पोलीस चौकशीत आरोपींनी मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे—
- हाऊस वायर – ₹१,००,०००
- कृषी साहित्य – ₹५०,०००
- प्लंबिंग साहित्य – ₹६०,०००
- महावितरण कंपनीची केबल – ₹६०,०००
- चार मोटारसायकली – ₹१,३०,०००
असा एकूण ₹४,००,००० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहन माछरे आणि मलकापूर शहर पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक शुभम बरदाडे यांच्यासह पोलीस कर्मचारी आसीफ शेख, संतोष कुमावत, प्रवीण गवई, योगेश तायडे, गणेश बरडे, दीपक सोनोने, नवल राठोड, मिनल शिंदे तसेच इतर पोलीस अंमलदार आणि होमगार्ड यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. अल्पावधीत आरोपींना जेरबंद करून चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत केल्याने मलकापूर शहर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.